प्रियांका गांधी पहिल्यांदाच उतरणार निवडणुकीच्या मैदानात

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूकांच्या रणधुमाळीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाठराखण करणाऱ्या त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी आता पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या निवडणुकांसोबतच देशातील काही ठिकाणच्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची पोटनिवडणूकही होणार आहे. यात केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. वायनाडमध्येही २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. वायनाडमधून प्रियांका गांधी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात एन्ट्री करणार आहेत.
वायनाडमधुन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विजय मिळवला होता. पण त्यांनी रायबरेलीतून खासदार राहण्याचा पर्याय निवडलाय. यामुळे आता वायनाडमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी मैदानात उतरतील. आतापर्यंत पडद्यामागे राहिलेल्या प्रियांका गांधी पहिल्यांदाच थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
राहुल गांधी यांनी वायनाडमधून २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यांना तेव्हा अमेठीत पराभवाचा धक्का बसला होता. तर आता २०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीत जिंकून आले. त्यांना वायनाड ऐवजी रायबरेलीचा खासदार होण्याचा पर्याय निवडला.
राहुल गांधी यांनी वायनाडची खासदारकी सोडल्यामुळे ही जागा रिक्त झालीय. या जागी प्रियांका गांधी मैदानात उतरणार आहेत. वायनाड हा काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ असून तिथं मुस्लीम मतदार असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. २००८ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना केल्यानंतर वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला. या निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेसनेच बाजी मारली आहे.
SL/ML/SL
15 Oct. 2024