पंतप्रधान इंटर्नशिप योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू
नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान इंटर्नशिप योजना नुकतीच सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत इंटर्नशिपसाठी निवडलेल्या तरुणांना दरमहा 5 हजार रुपये मिळतील. याशिवाय इंटर्नशिपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना एकरकमी 6 हजार रुपये देखील दिले जातील. या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र, सध्या ती प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवार 12 ऑक्टोबरपासून अर्ज करू शकतील. चालू आर्थिक वर्षात 1.25 लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. यासाठी 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेत केंद्र सरकारच्या नियमानुसार आरक्षण दिले जाणार आहे. नोकरीच्या संधींसाठी उमेदवारांना 12 महिन्यांचा अनुभव मिळेल.
कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, www.pminternship.mca.gov.in हे पोर्टल कंपन्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत कंपन्या त्यांच्या गरजा आणि इंटर्नशिप पोस्ट्सची माहिती देतील. त्यानंतर 12 ऑक्टोबरपासून हे पोर्टल उमेदवारांसाठी खुले होईल. उमेदवार 12 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत त्यांची पात्रता आणि इतर माहिती अपलोड करू शकतील. यानंतर मंत्रालय शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी कंपन्यांना देईल.
27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत कंपन्या निवड करतील. ऑफर स्वीकारण्यासाठी उमेदवारांना 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत वेळ मिळेल. उमेदवाराला पहिली ऑफर आवडत नसेल तर त्याला आणखी दोन ऑफर दिल्या जातील, त्यानंतर कोणतीही ऑफर दिली जाणार नाही. उमेदवार जास्तीत जास्त 5 संधींसाठी अर्ज करू शकेल.
SL/ML/SL
5 Oct. 2024