अयोध्येत होणार पंतप्रधान मोदींचा रोड- शो
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीरामनगरी अयोध्येमध्ये सध्या श्री राम मंदिरात श्रीरामाची प्रतिष्ठापना सोहळ्याची लगबग सुरु आहे. अयोध्येतील अवघे वातावरण राममय होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता.30) रोड शो करणार आहेत. त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आणि संघ परिवारातील संस्थांकडून जोरदार तयारी सुरू आहे.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ आणि आयोध्या धाम रेल्वे जंक्शनच्या उद्घाटनासाठी मोदी शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास अयोध्येत येत आहेत. अयोध्या – दिल्ली या विमान मार्गाला आणि वंदे भारतच्या अयोध्या – दिल्ली, अमृत भारतची अयोध्या – दरभंगा या मार्गावरील रेल्वे गाड्यांना पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवतील.
त्यानंतर धर्म पथ आणि राम पथावर 15 किलोमीटरचा त्यांचा रोड शो होईल. त्यानंतर विमानतळा जवळील मैदानावर मोदींची जाहीर सभा होणार आहे. या सभेला 3 लाखांचा जनसमुदाय गोळा करण्यासाठी भाजप आणि संघ परिवारातील संघटनांचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती प्रदेश भाजपचे संघटन महामंत्री धर्मपाल सिंह यांनी दिली.
रोड- शो साठी रस्त्यावर लाकडी बॅरिकेडीग करण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असून शुक्रवारी (ता. 29) त्याची रंगीत तालीम होणार आहे. रोड शो दरम्यान नागरिकांना मोदी यांचे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्वागत करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीचे नियोजन भाजपकडून जोरात सुरू आहे.
SL/KA/SL
28 Dec. 2023