पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
पुणे, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलं. आजपासून ही भूमिगत मेट्रो सुरु होणार आहे. नागरिकांनी आवर्जून हा मेट्रो प्रवास करावा असे मेट्रो प्रशासनाने आवाहन केले आहे.
या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले, जुन्या सरकराची कार्यपद्धती देशाला मागे घेऊन जाणारी होती. ती कार्यपद्धती आम्ही बदलून देशाला वेगाने पुढे घेऊन जात आहोत.गणेश कला क्रीडा मंदिरात दूरदृश्य प्रणालीमार्फत पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे लोकार्पण कात्रज ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन तसेच भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने मोदींच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. या मेट्रोमधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रवास केला. ही मेट्रो मार्गिका दुपारी ४ वाजल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्यात आली.
असा आहे मेट्रो मार्ग
पुणे मेट्रोच्या टप्पा १ ज्यामध्ये पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिका आहेत. यापैकी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या अंतिम भूमिगत मार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या मार्गिकेमुळे पुण्यातील दाट लोकवस्ती असणारा कसबा पेठ, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हा भाग मेट्रो मार्गीकेने जोडला जाणार आहे. मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दुपारी ४ वाजता या मार्गावर प्रवासी सेवा सुरू केली जाणार आहे. त्यानंतर थेट पीसीएमसी ते स्वारगेट हा प्रवास या मार्गावर करणे पुणेकरांना शक्य होणार आहे. पीसीएमसी ते स्वारगेट या प्रवासासाठी ३४ मिनिटे वेळ जाणार असून त्यासाठी ३५ रुपये भाडे असणार आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गावरील प्रवासी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे इंटरचेंज करून स्वारगेट किंवा पीसीएमसी या दिशेने प्रवास करू शकतात.
SL/ ML/ SL
29 Sept 2024