देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

कोची, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील कोची येथे भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोचे लोकार्पण केले. या प्रकल्पाची किंमत 1,137 कोटी रुपये आहे. वॉटर मेट्रो कोची आणि आसपासच्या 10 बेटांना जोडेल. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने या बोटींची निर्मिती केली आहे. या प्रकल्पात 78 इलेक्ट्रिक बोटी आणि 38 टर्मिनल आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोची वॉटर मेट्रो प्रकल्प देखील ‘मेड इन इंडिया’ असून तो अद्वितीय आहे. यासाठी मी कोची शिपयार्डचेही अभिनंदन करतो. वॉटर मेट्रोमुळे कोचीच्या आसपासच्या अनेक बेटांवर राहणाऱ्या लोकांना स्वस्त आणि आधुनिक वाहतूक उपलब्ध होईल. केरळमध्ये होत असलेला हा प्रयोग देशातील इतर राज्यांसाठीही आदर्श ठरेल.
सध्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा 8 बोटींनी सुरू करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 78 जलद, इलेक्ट्रिकली प्रोपेल्ड हायब्रीड बोटी सुरू केल्या जातील. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून कोची तलावाच्या काठावर राहणाऱ्या कुटुंबांना मुख्य बाजारपेठेपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. एक लाखाहून अधिक लोकांना वॉटर मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
किती लोक प्रवास करू शकतात
प्रवाशांच्या सेवेसाठी एकूण 78 पर्यावरणपूरक बोटी धावणार आहेत. यातील 23 बोटी 100 प्रवासी वाहून नेऊ शकतात. तर उर्वरित 55 बोटी 50 प्रवासी वाहून नेऊ शकतात. या बोटींव्यतिरिक्त, आपत्कालीन परिस्थितीत आणि देखभालीसाठी मुख्य ताफ्याला आधार देण्यासाठी चार बचाव नौका आहेत. वॉटर मेट्रोमध्ये एकावेळी 50 प्रवासी प्रवास करू शकतात. प्रवाशांच्या सोयीसाठी ते वातानुकूलित करण्यात आले आहे. यासोबतच याच्या खिडक्यांना चांगल्या दर्जाच्या काचा बसवण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांना बाहेरचे दृश्य पाहता येईल.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, ‘जागतिक दर्जाची कोची वॉटर मेट्रो आपल्या प्रवासासाठी सज्ज आहे. कोच्ची आणि आसपासच्या 10 बेटांना जोडण्याचा हा केरळचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कोच्ची वॉटर मेट्रो प्रकल्पात 1,136.83 कोटी रुपये खर्चाच्या 78 इलेक्ट्रिक बोटी आणि 38 टर्मिनल आहेत. या प्रकल्पाला केरळ सरकार (GoK) आणि KfW द्वारे निधी दिला जातो. KfW ही जर्मन फंडिंग एजन्सी आहे.
यामध्ये प्रवास करण्यासाठी साप्ताहिक भाडे 180 रुपये, मासिक भाडे 600 रुपये, तर तीन महिन्यांचे भाडे 1500 रुपये असेल. पहिल्या टप्प्यात, KWM सेवा कोचीमधील हायकोर्ट-वायपिन टर्मिनल्स आणि कक्कनड टर्मिनल्स दरम्यान सुरू होईल. वॉटर मेट्रो दररोज 12 तास सेवा देणार आहे. ते प्रत्येक 15 मिनिटांच्या अंतराने धावेल.
ही वॉटर मेट्रो पर्यावरणपूरक, विजेवर चालणारी आणि दिव्यांगांसाठी सुरक्षित असेल. या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सर्व बोटी वातानुकूलित असतील, त्यांना रुंद खिडक्या असतील, जेणेकरून लोकांना केरळच्या बॅकवॉटरचे दर्शन घेता येईल.ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकता. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल्सपासून वायटीला-कक्कनड टर्मिनल्सपर्यंत सेवा सुरू करण्यात येणार आहे. ‘कोच्ची-1’ कार्ड वापरून प्रवासी कोच्ची मेट्रो आणि वॉटर मेट्रो या दोन्ही मार्गांनी प्रवास करू शकतात. याशिवाय ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुकिंग करू शकता.
SL/KA/SL
25 April 2023