आजपासून वाढल्या Maruti च्या सर्व Cars च्या किमती

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील ग्राहकांच्या सर्वांधिक पसंतीच्या Maruti Suzuki या ऑटोमोबाईल कंपनीने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारा निर्णय घेतला आहे. देशातील मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या सर्व मॉडेलच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. मारुती सुझुकीच्या सर्व वाहनांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. कंपनीच्या सर्व मॉडेलची सरासरी किंमत ०.४५ टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. टाटा कंपनीनेही वर्षाच्या सुरुवातीला आपल्या गाड्यांच्या किमती ३ टक्क्यांनी वाढवल्या. ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या लक्झरी कार कंपन्यांनीही २०२४ मध्ये त्यांच्या किमती वाढवल्या आहेत.
मारुती कंपनीने २०२३ मध्ये प्रथमच दोन दशलक्ष युनिट्सचा वार्षिक विक्रीचा टप्पा ओलांडला. २०२३ मध्ये, कंपनीने २६९,०४६ युनिट्सची विक्री केली होती. २०२३ च्या शेवटच्या महिन्यात, कंपनीचे कार उत्पादन १२४,७२२ युनिट्सवरून सुमारे ३ टक्क्यांनी कमी होऊन १२१,०२८ युनिट्सवर आले होते. भारतीय कार मार्केटमध्ये जवळपास ५० टक्के कार मारुतीच्या आहेत आणि कमी किंमत आणि चांगले मायलेज यामुळे या कंपनीच्या कार भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंती ठरत आहेत.
महागाई आणि कच्च्या मालाच्या वाढीव किमती, कार पार्ट्स महाग झाल्यामुळे वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मारुती कमी किमतीच्या छोट्या कार अल्टोपासून ते मल्टी-युटिलिटी व्हिकल इनव्हिक्टोपर्यंत अनेक वाहनांची विक्री करते. त्यांची किंमत ३.५४ लाख ते २८.४२ लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. आता या सर्व कारच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी १ एप्रिल रोजी कंपनीने आपल्या कारच्या किमती वाढवल्या होत्या. याआधी टाटा, टोयोटा आणि Volkswagen सारख्या कंपन्यांनीही त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत.
SL/KA/SL
17 Jan. 2024