मुंबई प्रेस क्लबमध्ये झुंडीची “गुंडागर्दी”!

 मुंबई प्रेस क्लबमध्ये झुंडीची “गुंडागर्दी”!

मुंबई दि ११ (विक्रांत पाटील ) : मुंबई प्रेस क्लबमध्ये काल बुधवार, 10 डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता ऑक्टोबर महिन्यात प्रेस क्लबमध्ये घडलेली एक किरकोळ झटापटीची घटना अन् त्यांनतर करण्यात आलेले घाणेरडे ट्रोलिंग अन् प्रेस क्लब संस्थेची केली गेलेली बदनामी! त्या संदर्भात क्लबचे सदस्य असलेल्या काही जणांवर कारवाई करण्याचा विषय अजेंड्यावर होता. मात्र, या बैठकीत झुंडीची जबरदस्त “गुंडागर्दी” दिसून आली. झुंडीच्या गोंधळामुळे सभा दोनदा तहकूब करण्याची अन् शेवटी गुंडाळण्याची वेळ आली.

अतिशय सुजाण, उच्चविद्याभूषित मानल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या संस्थेत बहुसंख्य टाळकी एकत्र येऊन उच्छाद माजविण्याचा जो लाजिरवाणा प्रयत्न झाला, तो क्लबच्या अनेक ज्येष्ठ सदस्यांना व्यथित करून गेला. गावाकडल्या अशिक्षित, अडाणी लोकांचा गोंधळ तरी बरा, अशी स्थिती वेदनादायी असल्याचे मत अनेक पत्रकारांनी नंतर खासगीत व्यक्त केले.

क्लबच्या घटनेनुसार, 75 हून अधिक सदस्यांनी प्रस्ताव सादर केल्यास विशेष सर्वसाधारण सभा (SGM) बोलावणे कार्यकारिणीवर बंधनकारक असते. त्यानुसार, ही सभा बोलावली गेली होती. सुरुवातीला क्लबचे अध्यक्ष समर खडस यांनी घटनेत तरतूद असूनही सभेचे अध्यक्षपद नाकारले. यावर प्रवीण काजरोळकर यांनी मागच्या विशेष सभेतील कामकाजाचा दाखला देत आक्षेप नोंदवला. क्लबच्या घटनेनुसार खडस यांनीच सभेचे अध्यक्षपद भूषवावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. त्यावर खडस यांनी त्यांची समजूत काढत नैतिकतेच्या आधारावर, क्लबच्या कारभारात सक्रीय असलेले ज्येष्ठ सदस्य राजेश मस्कारन्हास यांच्याकडे सभेचे अध्यक्षपद सोपविले.

विशेष सभेचे कामकाज सुरू होताच ज्येष्ठ सदस्य पांडे यांनी अशी विशेष सभा भरवण्याची गरजच नसल्याचे सांगून आक्षेप घेतला. घटनेनुसार, क्लब कार्यकारिणीकडे कोणत्याही सदस्यांवर शिस्तभंग कारवाई करण्यासाठी थेट अधिकार असल्याने त्यांना अशा विशेष सभेची गरज नसल्याचा मुद्दा पांडे यांनी मांडला. त्यावरही झुंडीने गोंधळ घातला. माजी अध्यक्ष गुरुबीर सिंह यांनी प्रचंड बहुमताला घाबरून सभा गुंडाळण्याचा डाव असल्याचा आरोप केला. शेवटी सभाअध्यक्षांनी हस्तक्षेप करून हा गोंधळ थांबवला.

त्यानंतर सभेसाठी प्रस्तावावर स्वाक्षरी केलेल्या 96 सदस्यांपैकी मोजक्या 4 सदस्यांनी बोलावे आणि नंतर प्रस्तावाच्या विरोधातील 4 सदस्यांनी बोलावे, असा निर्णय सभाअध्यक्षांनी दिला. त्यानुसार कामकाजास सुरुवात होताच क्षणी झुंडींने हुल्लडबाजी करत आक्रमकपणे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रस्तावाच्या बाजूने बोलण्यासाठी उभ्या असलेल्या नचिकेत कुळकर्णी यांच्यावर झुंडीचे काही सदस्य धावून गेले. या गोंधळातच कुळकर्णी यांनी क्लबच्या बदनामीसाठी अत्यंत घाणेरड्या पातळीवर जाऊन बाहेरच्या व्यक्तींनी मोहीम राबविल्याचा मुद्दा मांडला. “गांधीवादाचे सोंग मिरवणारे काही सदस्य उजव्यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत,” अशी टिप्पणी करताच नवा वाद उद्भवला. झुंडीतील काही सदस्य आक्रस्ताळे होऊन कुळकर्णी यांच्यावर धावून गेले, तर काहींनी सभाअध्यक्षांसमोर समोर जाऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गुरुबीर सिंह आणि जतिन देसाई यांनी कुळकर्णी यांच्या निषेधाचा सूर आवळला.

त्यानंतर श्रुति गणपत्ये यांनी संरक्षणाची मागणी करत बोलण्यास सुरुवात केली. क्लबमधील वादानंतर, त्या घटनेला दिले गेलेले चुकीचे वळण, प्रोफेशनल ट्रोलर्सचा वापर, हीन पातळीवर उतरून केले गेलेले उपद्व्याप, धर्माचा वापर, कुटुंबाला ओढून केल्या गेलेल्या घाणेरड्या टीका या सर्वांचा समाचार घेतला. या अशा पद्धतीच्या प्रवृत्तींना आपण साथ देणार आहोत का, असा प्रश्न करत त्यांनी सर्वच सदस्यांना अंतर्मुख होऊन विचार करण्याचे आवाहन केले. युवा सदस्य रोहन टिल्लू यांनी प्रेस क्लबची नक्षली अड्डा म्हणून केली गेलेली बदनामी, शहरी दहशतवाद प्रपोगांडा हे सारे संतापजनक असल्याचे सांगितले.

प्रवीण काजरोळकर यांनी पत्रकारांमध्ये कामाच्या रगाड्यात होणाऱ्या किरकोळ कुरबुरी, वाद-विवाद हे नित्याचेच असल्याचे सांगितले. त्या घटनांना कधीही कोणतेही स्वरूप दिले जात नाही, त्या विसरल्या जातात, मग नेमकी ही घटना कशी पेटविली गेली, असा सवाल त्यांनी केला. मुंबईतील पत्रकारांची “चाय-बिस्कुट पत्रकार” अशी हेटाळणी करणाऱ्या दिल्लीतील एका दीडशहाण्या पत्रकाराला मराठी अस्मितेचा हुंकार जपणाऱ्या मुंबईतील पत्रकाराने कानफटवल्याचा प्रसंग काजरोळकर यांनी सांगितला. मंत्रालयात एका पत्रकाराने कॅमेरामनच्या कानशिलात लगावली होते. एव्हढ्या गंभीर घटना असून त्या दुर्लक्षिल्या गेल्या. मात्र, आताची घटना जाणूनबुजून चिघळवली, यामागे काही “बाहेरील शक्ती” कार्यरत असल्याचा आरोपही काजरोळकर यांनी केला. पुढे त्यांनी माजी अध्यक्ष गुरुबीर सिंह यांचा संत-महात्मा असा उल्लेख केला. त्यावरून झुंडीने त्यांना घेरले आणि बोलण्यापासून रोखले.

मुंबई महापालिका कव्हर करणाऱ्या एका पत्रकाराने सभ्यतेच्या मर्यादा आणि संकेत झुगारून धुडगूस घातला. दरम्यानच्या काळात प्रसाद काथे हे तीन वेळा प्रस्तावाच्या विरोधात बोलण्यासाठी पुढे आले; पण झुंडीच्या गोंधळात त्यांचाही आवाज दाबला गेला. ते हतबल झालेले दिसले. राजू कोरडे, सौरभ शर्मा यांनी अनेकवेळा पुढे धावून जात आक्रमक होऊ पाहणाऱ्या झुंडीतील सदस्यांना रोखले. अनेक ज्येष्ठ टीव्ही आणि प्रिंट पत्रकार, फोटोग्राफर यावेळी उपस्थित होते. त्यांनीही गोंधळ निस्तरण्यात सहकार्य केले. शेवटी झुंडीचा गोंधळ काही थांबत नसल्याने विशेष सभा अनिश्चित काळासाठी स्थगित करत गुंडाळण्यात आली. सभेचे कामकाज आटोपल्यानंतर गुरुबीर सिंह यांनी खुर्चीवर उभे राहून जोशपूर्ण भाषण केले. पण शेवटी एकंदरीतच झुंडीच्या गोंधळ, धुडगूस अन् गुंडागर्दीने प्रेस क्लबच्या प्रतिष्ठेला कलंकित करून स्वतःच्याच पाठा थोपटून घेतल्या. काही शिकल्या-सवरल्या, शहाण्या पत्रकारांनी राजकारण्यांनाही मागे टाकले!ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *