नागपूर हिवाळी अधिवेनशनात पावसाची हजेरी

नागपूर दि ६– उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत असले तरी प्रत्यक्षात आजपासून इथे पावसाने हजेरी लावली असून पुढील आणखी दोन दिवस हीच स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे थंडी अनुभवायला आलेल्या मुंबईकरांना ओले व्हावे लागत आहे.
मागील आठवड्यात राज्यभर अवकाळी पावसाने दणका दिल्यानंतर आजपासून विदर्भाला पुन्हा एकदा पावसाने घेरल्याचे दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता .त्यामुळे नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन पावसाळी ठरण्याची शक्यता दिसून येत आहे.
बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ नावाचे चक्रीवादळ तयार झाले असून, येत्या एक ते दोन दिवस ते सक्रिय राहणार आहे. आजपासून पडणाऱ्या पावसामुळे नागपूरचे वातावरण जरी थोड थंड झालं असेल तरी राजकीय वातावरण मात्र तापू लागले आहे. उद्या पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे . आज या अधिवेशनात राज्य सरकार ला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी बैठक घेऊन आपली रणनीती आखली आहे. तर राज्य मंत्रिमंडळाची बैठकही होऊन त्यात विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी झाली. आज दिवसभर नेते मंडळी नागपुरात दाखल होती त्यामुळे इथले राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
मराठा , ओबीसी , धनगर आरक्षण, ललीत पाटील ड्रग्ज प्रकरण, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, कंत्राटी नोकर भरती,राज्यात अनेक जिल्ह्यात पडलेला दुष्काळ, राज्यात कायदा , सुव्यवस्थेचा प्रश्न,समृद्धी महामार्गावरील अपघाताची मलिका अशा अनेक मुद्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे त्यावर सरकारकडून काय उत्तरे येतात आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भाच्या पदरात अधिकचे काय पडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.