प्रयागराज रेल्वेस्थानक २६ फेब्रुवारीपर्यंत बंद
 
					
    प्रयागराज, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याच्या पर्वणीला आता शेवटचे १० दिवस बाकी आहेत. १३ जानेवारीपासून सुरु झालेल्या या महाकुंभाला दररोज लाखोंच्या संख्येने हजेरी लावत आहेत. प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन करताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. काही दिवसांपूर्वीच अमृतस्नानादरम्यान झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी झाल्याने ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचे प्राण गेले आहेत. यामुळेच आता उर्वरित कालावधीत दुर्घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे . रेल्वे प्रशासनाने महाकुंभातील वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रयागराज संगम स्थानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .
याशिवाय महाकुंभात तैनात असलेल्या अधिकाऱ्यांची ड्युटी २७ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. महाकुंभच्या परिसरात वाहनांचा प्रवेश बंद करून सर्व प्रकारचे पास रद्द केले आहेत. प्रयागराजमधून जाणाऱ्या १९ गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. संगमपासून १०-१२ किमी लांब बांधलेल्या पार्किंगमध्ये वाहने थांबवली जात आहेत. त्यामुळे भाविकांना संगमावर पायी चालत जावे लागत आहे.
SL/ML/SL
17 Feb. 2025
 
                             
                                     
                                    