अनुकंपा तत्त्वावरील नोकरी बाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील रहावे.

 अनुकंपा तत्त्वावरील नोकरी बाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील रहावे.

मुंबई दि १३– आपल्या परिवारातील कर्ता पुरुष गेल्यानंतर आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या खचलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनुकंपा तत्त्वाच्या नोकरीची अत्यंत गरज असते. अशावेळी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून संबंधित पात्र उमेदवाराला लवकरात लवकर नोकरी देऊन त्याला आर्थिक स्थैर्य कसे मिळेल हे पाहिले पाहिजे ! असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात ७० उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याच्या समारंभात बोलत होते.

यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांच्यासह उमेदवारांचे कुटुंबीय व एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात म्हणजे एसटी महामंडळात शासनाच्या धर्तीवर रा.प. सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी मृत झाल्यास त्यांच्या अवलंबितांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद आहे.

त्यानुसार सन २०१६ पासून प्रलंबित असलेले अनेक अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचे प्रस्ताव मार्गी लावण्यात आले आहेत. या बरोबरच विभागीय स्तरावर आणखी ६६ उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अनुकंपा तत्त्वावर नोकरीचे नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. अशा रीतीने वाहतूक निरीक्षक, प्रभारक, लेखाकार, सहाय्यक सुरक्षा निरिक्षक, लिपिक टंकलेखक अशा विविध पदांवर तब्बल १३६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर एसटी महामंडळाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्यात आले आहे.

एसटीच्या ६ व्या प्रादेशिक विभागाची निर्मिती

निर्णयाचे विकेंद्रीकरण करून स्थानिक पातळीवर प्रशासकीय गतिमानता आणण्याच्या उद्देशाने कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एकूण ६ प्रादेशिक विभागामध्ये विभाजन करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने हे विभाग निर्माण करण्यात आले असून ६ वा शेवटचा नाशिक प्रादेशिक विभाग निर्माण करण्याची मंजुरी एस टी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *