दुर्मिळ भीमथडी अश्वांना अधिकृत प्रजाती म्हणून मिळणार मान्यता

पुणे, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा घोडदळाचा अविभाज्य भाग म्हणून ओळखले जाणारे भीमथडी अश्व आता अधिकृत स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. या संदर्भात लवकरच राजपत्रीय अधिसूचना जारी करण्यात येणार असून यामुळे आता अनेक वर्षे दुर्मिळ भीमथडी अश्वांचा प्रलंबित असलेला अधिकृत अश्व प्रजातीचा दर्जा त्यांना मिळेल, अशी माहिती अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटनेचे आणि बारामती अश्वपागेचे संस्थापक रणजीत पवार आणि बिकानेरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इक्विन्सच्या प्रादेशिक केंद्राचे प्रमुख डॉ. शरद मेहता यांनी आज आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना रणजीत पवार म्हणाले, “भीमथडी अश्वांच्या प्रजातीचा उगम महाराष्ट्रात भीमा नदीच्या काठी झाला. हे अश्व दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात आढळतात. ऐतिहासिकदृष्ट्या भीमथडी अश्वांनी मराठा साम्राज्याचे घोडदळ म्हणून स्वराज्याच्या मोहिमांमध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी बजावली आहे.”
असे असले तरीही दुर्दैवाने भारतातील ६ मान्यताप्राप्त अश्व प्रजातींमध्ये आजवर भीमथडी अश्वांना मान्यता मिळाली नाही असे सांगत पवार पुढे म्हणाले, “हेच लक्षात घेत आम्ही अश्वप्रेमी आणि महाराष्ट्रातील काही अश्व प्रजातींचे संवर्धन करणा-यांनी या प्रजातीची पुनर्स्थापना करण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये आम्हाला अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी), बारामती आणि इतर सहकारी यांचीही मोलाची मदत झाली. या अंतर्गत राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्राच्या सहकार्याने एक समर्पित टीम तयार करण्यात आली. याद्वारे वैज्ञानिक आणि प्रशासकीय आवश्यकतांची पूर्तता करण्यात आली. शिवाय डॉ. मेहता यांच्या नेतृत्त्वाखाली वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या शिष्टमंडळाने बारामतीला भेट दिली. शिवाय महाराष्ट्रात आम्ही स्वतः देखील विविध स्थळांना भेटी देऊन स्थानिक शेतकरी आणि अश्व पालक वापरत असलेल्या या भीमथडी अश्वांची खरी उपयुक्तता आणि क्षमता त्यांना दाखवून दिली.
आता आमच्या या तीन वर्षांच्या प्रयत्नांना यश आले असून भीमथडी अश्वांना अधिकृत अश्व प्रजातीचा दर्जा मिळेल असेही पवार म्हणाले.
या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ मेहता म्हणाले, “भीमथडी अश्व प्रजातीला हा अधिकृत दर्जा मिळवून देण्यासाठी १००० हून अधिक घोड्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करून ते नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इक्विन्स (एनआरसीई) यांकडे पाठवण्यात आले. यांतील ५०० हून अधिक नमुन्यांची डीएनए चाचणी करीत ही खरोखरच एक स्वतंत्र प्रजाती आहे आणि भारतातील कोणत्याही प्रस्थापित प्रजातीसोबत तिचा डीएनए जुळत नाही याची खात्री करून घेण्यात आली.”
सर्व घोड्यांचे नमुने गोळा करण्यासाठी भटक्या घुमंतू समुदाय ज्यांच्याकडे हे अश्व मोठ्या प्रमाणात आढळतात त्यांना यासाठी तयार करणे, ते परीक्षणासाठी बिकानेर येथे पोहोचेपर्यंत सर्व गोष्टीमध्ये रणजित पवार यांनी खूप महत्वाचे योगदान दिले आहे.
आज या प्रजातीला महत्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी आपण एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला असून अश्वांच्या पोलो या साहसी खेळासारख्या अनेक खेळांमध्ये या प्रजातीचा समावेश करण्याची आमची योजना आहे. सोबतच, या प्रजातीची वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रजनन पद्धती सुधारण्यासाठी ब्रीड शो आणि शैक्षणिक कार्यशाळा देखील आयोजित करण्याचा आमचा मानस आहे, असे रणजीत पवार म्हणाले.
याचाच एक भाग म्हणून येत्या २० आणि २१ जानेवारी रोजी बारामतीत होणाऱ्या कृषी मेळाव्यात भीमथडी अश्व प्रजातीचा पहिला अधिकृत शो होणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली.
ML/KA/PGB 9 Jan 2024