प्राजक्ता माळीचा फुलवंती चित्रपट आता हिंदीत
मुंबई, दि. १९ : ऑक्टोबर 2024 मध्ये रीलिज झालेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या फुलवंती हा चित्रपट विशेष गाजला होता. त्यानंतर ओटीटी रीलिजनंतरही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट हिंदीतही पाहता येणार आहे. प्राजक्ता आणि गश्मीरने आज इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत ही बातमी शेअर केली आहे.
प्राजक्ताची निर्मिती आणि मुख्य भूमिका असणारा ‘ फुलवंती ‘ आता हिंदी भाषेतही पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच हा सिनेमा Amazon Prime Video वर रीलिज करण्यात आलेला. आता या सिनेमाचे हिंदी व्हर्जनही या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
लाइव्ह व्हिडिओमध्ये प्राजक्ता-गश्मीरने हिंदी व्हर्जन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध असल्याचे अपडेट दिले. गश्मीर म्हणाला की, ‘संपूर्ण महाराष्ट्राने फुलवंतीवर जे प्रेम केलं, त्याकरता सर्वांचे खूप आभार. Amazon Prime Video वरही तुमचा प्रतिसाद उत्कृष्ट राहिला आहे. आता बातमी अशी आहे की, फुलवंतीचे आता हिंदीमध्ये डबिंग करण्यात आले आहे. जे लोक हा सिनेमा सबटायटल्स वापरुन बघत होते, ते आता हिंदीत पाहू शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदीतही जे डबिंग झाले आहे, ते मी आणि प्राजक्ताने स्वत: केले आहे. तो आमचाच आवाज आहे. त्यामुळे त्यातील जो भाव आहे, तो मुळ कलाकारांच भाव आहे. इतर कोणत्या डबिंग आर्टिस्टने हे डबिंग केलेले नाही.’
प्राजक्ताने म्हटले की, ‘जेव्हा सिनेमा रीलिज होत होता तेव्हा, नाना पाटेकर-सचिन पिळगांवकर हे ज्येष्ठ कलाकार मला ओरडत होते की, तुम्ही हा सिनेमा हिंदीत डब का केला नाही? आता थोडा उशीरच झालाय. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना सबटायटल्ससह सिनेमा पाहायला आवडत नाही, त्यांनी हा सिनेमा पाहिला नव्हता.’ प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना आवाहन केले की, अमराठी प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्याची विनंती करावी.
SL/ML/SL