चांद्रयान ३ च्या प्रज्ञान रोव्हरचे काम सुरळीतपणे सुरू
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक विक्रम घडवणाऱ्या चांद्रयान -३ च्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील यशस्वी लँडींग झाले. त्यानंतर त्यातील प्रज्ञान रोव्हर बाहेर येऊन कशी कामगिरी करतो याकडे शास्त्रज्ञांने लक्ष लागून राहीले होते. काल सायंकाळी झालेल्या चांद्रयान ३ मधील विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतर, पुढचे मोठे पाऊल त्यातून रोव्हर ‘प्रज्ञान’ बाहेर काढणे होते. ‘प्रज्ञान’ रोव्हर आता लँडरमधून बाहेर आल्याचे इस्रोने सांगितले आहे. रोव्हरने चंद्रावरून माहिती पाठवण्यास सुरुवात केली आहे.
लँडर चंद्रावर उतरल्यानंतर सुमारे अडीच तासांनी रोव्हर बाहेर काढण्यात आले. प्रज्ञान रोव्हरची चंद्राच्या भूमीवर वाटचाल सुरू झाली आहे. रोव्हर प्रज्ञानला ६ चाके आहेत. हे रोबोटिक वाहन पुढील १४ दिवस चंद्रावर संशोधन करणार आहे. हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर जसे जसे पुढे जाईल तसे तसे ते भारताच्या पाऊल खुणा चंद्रावर सोडेल. चंद्रावर इस्रोचा लोगो आणि भारताचे प्रतीक (अशोक स्तंभ) देखील कोरले जाणार आहे.
विक्रम लँडर यशस्वी लँड झाल्यावर त्यातून प्रज्ञान रोव्हर बाहेर काढण्यासाठी थोडा वेळ लागला. विक्रम लँडरच्या टचडाउनप्रक्रियेत चंद्रावरची धूळ उडाली होती. ही धूळ स्थिर होईपर्यंत रोव्हर बाहेर काढणे शक्य नव्हते. वास्तविक चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा खूपच कमी आहे. यामुळे, धूळ पृथ्वीवर जशी लवकर स्थिरावते तशी ते चंद्रावर स्थिरावत नाही. ही धूळ खाली बसण्याआधी रोव्हर बाहेर काढला गेला असता तर त्यावरील कॅमेरे आणि इतर संवेदनशील उपकरणांना नुकसान झाले असते.
चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान ३ च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर, प्रज्ञान रोव्हर मॉड्यूल आता ISRO शास्त्रज्ञांनी दिलेल्या १४ दिवसांचे कार्य सुरू करणार आहे. रोव्हर ‘प्रज्ञान’ आता चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक प्रयोग करण्यासाठी लँडर मॉड्यूलमधून बाहेर आले असून विविध प्रयोग करण्यास ते सज्ज झाले आहे.
SL/KA/SL
24 Aug 2023