भारत-अमेरिकेसह २१ देशात प्रभू रामाचे पोस्ट तिकीट जारी

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २२ तारखेला अयोध्येमध्ये श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या आधीच्या धार्मिक विधींना उत्साहाने सुरुवात झाली आहे. न भूतो न भविष्यती असा हा सोहळा स्मरणात रहावा म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. भारतीयांच्या ह्रदयात वसलेले प्रभू श्रीराम आता पोस्टल स्टॅम्पच्या रूपाने जगभरातील २० देशांमध्येही विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री राम जन्मभूमी मंदिराच्या पोस्ट तिकीटाचे अनावरण केले. त्याचबरोबर त्यांनी जगभरातील प्रभू रामाच्या तिकीटांचे एक पुस्तकही प्रकाशित केले. पोस्ट तिकीटावर राम मंदिर, चौपाई’ मंगल भवन अमंगल हारी’, सूर्य, शरयू नदी आणि मंदिराच्या परिसरातील मूर्तींचा समावेश करण्यात आला आहे. भारत-अमेरिकेसह एकूण २१ देशांनी प्रभू रामाच्या नावाने पोस्ट तिकीटे प्रसिद्ध केली आहेत
या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले , पोस्टल स्टँपचे कार्य आम्ही सर्वजण जाणतो. मात्र पोस्टल स्टँप आणखी एक महत्वपूर्ण भूमिका पार पाडते. पोस्टल स्टँप इतिहास आणि ऐतिहासिक क्षणांना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम असते. महर्षि वाल्मिकींचे वचन आजही अमर आहे, ज्यात त्यांनी म्हणाले आहे की, यावत् स्थास्यंति गिरयः, सरितश्च महीतले। तावत् रामायणकथा, लोकेषु प्रचरिष्यति , म्हणजे जोपर्यंत पृथ्वीवर पर्वत आणि नद्या आहेत तोपर्यंत रामायणाची कथा लोकांमध्ये प्रचलित राहील.
पंतप्रधान मोदींनी रामाच्या पोस्ट तिकीटांचे एक पुस्तकही जारी केले आहे. त्यामध्ये ६ तिकीटांचा समावेश आहे. राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायु, केवटराज आणि शबरी यांच्यावर टपाल तिकीट काढण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या व्हिडियो संबोधनात म्हटले की, आज राम मंदिराशी संबंधित ६ स्मारक डाक तिकीटे जारी केली आहेत. त्याचबरोबर प्रभु श्रीरामाशी संबंधित डाक तिकीटे जारी केली आहेत. त्याचा एक अल्बम जारी केला आहे.
SL/KA/SL
18 Jan. 2024