उत्तर महाराष्ट्रातील पोस्ट सेवा वेगवान करण्यासाठी मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांना महत्त्वाचे यश…
नाशिक,दि.२९ :- नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पोस्ट सेवा वेगवान करण्यासाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले असून नाशिक L2 पार्सल हबचे L1 पार्सल हबमध्ये श्रेणीवर्धन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. यामुळे नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील पोस्ट पार्सल सुविधा होणार अधिक वेगवान होणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून ४ जानेवारी २०२५ रोजी नाशिकमधील भारतीय पोस्ट विभागाच्या इंट्रा सर्कल हबचे (ICH) नॅशनल सॉर्टींग हबमध्ये (NSH) श्रेणीवर्धन करण्यात आले. त्यामुळे स्पीड पोस्ट सुविधा अधिक वेगवान झाली. त्याच धर्तीवर मेल आणि पार्सल ऑप्टिमायझेशन प्रोजेक्ट (MPOP) नेटवर्क अंतर्गत नाशिक पार्सल हबचे देखील श्रेणीवर्धन करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू होता.
नाशिकमध्ये पोस्ट खात्याची स्थावर मालमत्ता मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा स्पर्धात्मक फायदा देखील नाशिक पार्सल हबच्या श्रेणीवर्धनासाठी मिळणार आहे. तसेच समृद्धी महामार्ग, रेल्वे सेवा आणि विमानसेवेची वाढलेली व्याप्ती या गोष्टी देखील यासाठी पूरक ठरणार आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे याबाबतची मागणी केली होती. तसेच दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी देखील मंत्री छगन भुजबळ यांनी या अनुषंगाने पुन्हा पत्र लिहिले होते. त्यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत नाशिक L2 पार्सल हबचे L1 पार्सल हबमध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी मिळाली आहे.
देशात सध्या कार्यरत असलेल्या १०९ पार्सल हबपैकी ७९ पार्सल हबच्या श्रेणीत बदल करणे प्रस्तावित होते. त्यांपैकी L2 पार्सल हब प्रकारातून L1 प्रकारात श्रेणीवर्धन होण्याचा मान मिळवणारे नाशिक हे एकमेव L2 पार्सल हब ठरले आहे. तसेच केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या धोरणानुसार देशात L1 पार्सल हबची कमाल संख्या ४५ निश्चित करण्यात आलेली आहे.
त्यामुळे या श्रेणीवर्धनाच्या निमित्ताने देशातील निवडक ४५ L1 पार्सल हबमध्ये आपल्या नाशिकचा समावेश झाला आहे. या ४५ पैकी संपूर्णपणे स्वयंचलित व अद्ययावत (Fully Automated) असणाऱ्या ४० पार्सल हबमध्ये देखील नाशिकचा समावेश झाला आहे. तसेच आतापर्यंत महाराष्ट्रातील अशा प्रकारे L1 दर्जा मिळालेले मुंबई, पुणे आणि नागपूर पार्सल हब हे पोस्टाचे क्षेत्रीय कार्यालय आहे. मात्र विभागीय कार्यालय असतानादेखील नाशिक हे L1 प्रकारात श्रेणीवर्धीत करण्यात आलेले महाराष्ट्रातील एकमेव पार्सल हब आहे.
या निर्णयामुळे सदर श्रेणीवर्धीत नाशिक रोड स्थित L1 पार्सल हबसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि स्वयंचलित व अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे. पार्सल हब सुविधा ही प्रामुख्याने मोठे व अधिक वजनाचे पार्सल पाठविण्यासाठी वापरली जाते.
ज्याप्रमाणे इंट्रा सर्कल हबचे (ICH) नॅशनल सॉर्टींग हबमध्ये (NSH) श्रेणीवर्धन झाल्यामुळे स्पीड पोस्ट पाठवण्याचा कालावधी साधारणपणे तीन दिवसांवरून दोन दिवसांवर आला आहे. त्याचप्रमाणे नाशिक L2 पार्सल हबचे L1 पार्सल हबमध्ये श्रेणीवर्धन झाल्यानंतर मोठे व अधिक वजनाचे पार्सल पाठविण्यासाठी लागणाऱ्या कालावधीतही घट होणार आहे. आता धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यांमधील पाठवले जाणारे व येणारे पार्सल यापूर्वी मुंबईला जात असत, ते आता मुंबईला न जाता थेट नाशिकमधूनच पाठवले जातील व येतील. तसेच अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्या ग्रामीण भागातील पार्सल सुविधेसाठी पोस्टाशी करारबद्ध असून या निर्णयामुळे त्यांचे पार्सल देखील नाशिकच्या ग्रामीण भागात अधिक वेगाने पोहचणे शक्य होणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार असून या निर्णयाच्या माध्यमातून नाशिकच्या पोस्ट पार्सल सुविधेला मोठी चालना मिळणार आहे. विविध व्यावसायिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, उद्योजक तसेच सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे.ML/ML/MS