केंद्र सरकारकडून सोन्यासाठी ‘वन नेशन, वन रेट’ लागू होण्याची शक्यता

 केंद्र सरकारकडून सोन्यासाठी ‘वन नेशन, वन रेट’ लागू होण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर सीमाशुल्कात मोठी कपात करण्यात आल्यामुळे देशभरातील बाजारपेठांमध्ये सोन्याचे भाव गडगडले आहेत. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून लवकरच सोन्याचा देश देशभरात एकच रहावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ‘वन नेशन, वन रेट’ पॉलिसी लागू झाल्यानंतर विविध शहरांतील ज्वेलर्सच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. ज्वेलर्स आपल्या मनाप्रमाणे दर वाढवू किंवा कमी करू शकणार नाहीत.

देशातील विविध शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे असतात. सोन्या-चांदीच्या दरांत प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या करांशिवाय इतर अनेक गोष्टींचीही भर पडते. यामुळे या मौल्यवान धातूंच्या किमतीही राज्यांमध्ये बदलत असतात. मात्र, आता देशात मोठा बदल होणार आहे. लवकरच ‘वन नेशन, वन रेट’ धोरण संपूर्ण देशात लागू होणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. हे धोरण संपूर्ण देशभरात लागू झालं, तर तुम्ही देशात कुठेही सोनं खरेदी केलं, तरीसुद्धा तुम्हाला सारखाच दर मिळेल. तसं झाल्यास सोन्याचे व्यापारी आणि ज्वेलर्स यांनाही सोन्याची खरेदी-विक्री करणं सोपं होईल. देशभरातील सर्व बड्या ज्वेलर्सनीही याची अंमलबजावणी करण्याचं मान्य केलं आहे.

‘वन नेशन, वन रेट’ पॉलिसीच्या अंमलबजावणीमुळे बाजारपेठेत पारदर्शकता वाढेल. सोन्याच्या किमतीत तफावत असल्यानं त्याच्या किमतीही कमी होऊ शकतात. याशिवाय सोनं विक्रीसाठी काही वेळा मनमानी दर आकारणाऱ्या ज्वेलर्सवरही अंकुश ठेवण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सध्या 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 74 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तसं पाहायला गेलं तर देशातील प्रत्येक शहरांतील सोन्याच्या किमतींमधील फरक फारसा नसतो. तरीदेखील सोन्याच्या दरात 200 ते 500 रुपयांचा फरक पाहायला मिळतो. विशेष म्हणजे, जेम अँड ज्वेलरी कौन्सिलनंही याला पाठिंबा दिला आहे. मात्र, याबाबत सरकार अंतिम निर्णय कधी घेणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या धोरणावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक ज्वेलर्स असोसिएशन या धोरणाशी सहमत असून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करत आहेत.

सध्या सोन्याचे दर मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच, MCX च्या आधारे ठरवल्या जातात. या किमती स्पॉट किमती आहेत आणि प्रत्येक शहरातील सराफा असोसिएशनचे व्यापारी बाजार उघडण्याच्या वेळी एकत्रितपणे किंमत ठरवतात. मागणी, पुरवठा, जागतिक बाजारपेठ आणि महागाई लक्षात घेऊन या किमती ठरवल्या जातात. हे दर वेगवेगळे असतात कारण प्रत्येक शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी दर ठरवले आहेत.

SL/ML/SL

24 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *