जागतिक लोकसंख्या दिन : लोकसंख्या वाढ नियंत्रण कायद्याची गरज.
मुंबई, दि. 11 (राधिका अघोर) :आज जागतिक लोकसंख्या दिन आहे. याच दिवशी म्हणजे 11 जुलै 1987 साली, जगाच्या लोकसंख्येनं पाच अब्जांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे जागतिक कीर्तीचे लोकसंख्या तज्ज्ञ डॉ के. सी. झकारिया यांनी हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जावा, असा प्रस्ताव मांडला आणि संयुक्त राष्ट्रांकडून तो मंजूर ही करण्यात आला. त्यामुळे आजचा दिवस जागतिक लोकसंख्या दिन ठरला.
विशेष रोचक गोष्ट म्हणजे, हा पाच अब्जांचा टप्पा गाठायला आपल्याला हजारो वर्ष लागली. मात्र, त्या पुढच्या जेमतेम 200 वर्षात त्यात सातपट वाढ झाली. आता 2030 पर्यंत जगाची लोकसंख्या 8.5 अब्जांच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे. आणि अर्थातच, भारताचा त्यात मोठा वाटा असणार आहे. आज जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देश म्हणून भारत ओळखला जातो. आपण चीन ला मागे टाकत 1.44 कोटी लोकसंख्येसह पहिल्या स्थानी पोहोचलो आहोत.
यंदाच्या जागतिक लोकसंख्या दिनाची संकल्पना आहे, ‘ leave no one behind, count everyone’ म्हणजे लोकसंख्येचा विचार करतांना आधी जगाची लोकसंख्या नेमकी किती आहे, हे तपासा, यात कोणी राहून गेलं असेल, तर त्या सगळ्यांचा समावेश करा, हे पाहिलं तत्व आहे. कारण आपण ही जी संख्या, संख्या म्हणतो आहोत, ती जिवंत माणसं आहेत, आयुष्यं आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचा विचार, त्या सगळ्यांची गणती करूनच आपल्याला नेमका आकडा काढता येईल. आणि अंदाजे नव्हे तर, नेमका आकडा कळल्यावरच त्यानुसार अचूक धोरणं आखता येतील. असा विचार या संकल्पनेमागे आहे.
त्यासोबतच, आधुनिक काळातील शस्त्र असलेले डेटा कलेक्शन किती महत्वाचे आहे, हे ही, ही संकल्पना आपल्याला सांगते. त्यामुळे जगाची एकूण लोकसंख्या किती आहे, आणि त्या सर्व लोकांची पार्श्वभूमी, त्यांचा आर्थिक, सामजिक स्तर, त्यांची आरोग्यविषयक स्थिती असं सगळं संकलित करणारी अद्ययावत नोंदणी यंत्रणा विकसित करण्यावर सर्वच देशांनी गुंतवणूक वाढवायला हवी. कारण त्यातूनच आपल्याला समस्या कळतील आणि त्यावर उपाययोजना करता येतील.
म्हणजेच, अजूनपर्यंत कोणत्या समुदायाची यात नोंदणी झालेली नाही, आणि नसेल, तर ती का झालेली नाही, याचा शोध घेऊन, त्यावर काम करण्याची गरज, ‘ कोणालाही मागे ठेवू नका, प्रत्येकाची मोजदाद करा ‘ ही संकल्पना आपल्याला सांगते.
आधी म्हंटल्याप्रमाणे, भारतासाठी लोकसंख्येची वाढ, हा एकेकाळी विस्फोटच मानला गेला. आता त्यात काही प्रमाणात स्थैर्य आलं असलं तरी, आधीच अफाट असलेली लोकसंख्या देशाच्या सर्व संसाधनांसमोर एक मोठं आव्हान आहे. देशाची संसाधने त्या तुलनेत अपुरी असल्यानं, त्यांचा सहाजिक ताण देशावर पडतो. त्याशिवाय, इतक्या लोकांना रोजगार, अन्नसुरक्षा, किमान चांगलं जगण्याइतक्या सुविधा देणं खूप मोठं आव्हान आहे. त्यासाठी दोन पातळ्यांवर काम करावं लागेल. एकीकडे लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा लागेल, तर दुसरीकडे असलेल्या संसाधनांचा आणि मनुष्यबळाचा चांगला वापर करत, त्यातून माणसांचं जगणं अधिक सुखकर होईल, अशा पायाभूत सुविधा आणि व्यवस्था बनवाव्या लागतील.
हे खूप आव्हानात्मक आणि व्यापक काम आहे. मात्र त्याशिवाय पर्यायही नाही. गरज आहे ती सामूहिक इच्छाशक्ती आणि एकाच दिशेनं विचार करण्याची. किमान या मुद्द्यावर तरी देशाने एकत्रित वाटचाल केली, तर आपण आपलं मनुष्यबळ आपल्या प्रगतीसाठी वापरू शकू आणि सर्वांच्या किमान गरजा पूर्ण होऊ शकतील, अशी व्यवस्था असलेला विकसित भारत घडवू शकू.
ML/ML/PGB 11 July 2024