राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा घोळ कायम, सध्या तात्पुरता कार्यभार
मुंबई दि ३१– राज्य पोलीस महासंचालक पदाचा घोळ अद्याप कायम असून आज या पदाचा तात्पुरता कारभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांकडे देण्यात आला असून, राज्याच्या मुख्य सचिव पदी डॉ नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते आज निवृत्त झाले आहेत. त्यांची नियुक्ती राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी आधीच करण्यात आली आहे. महासंचालक पदासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. सध्या त्या केंद्रात नियुक्तीवर असून विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो आता रद्द झाला आहे. मात्र त्या स्वतः मुंबई पोलीस आयुक्त पदी येण्यास इच्छुक होत्या अशी माहिती होती.
त्यांना मुंबईचे आयुक्तपद दिले असते तर सेवा ज्येष्ठता यादीत मोठा प्रश्न निर्माण झाला असता , संदीप विश्र्नोई, विवेक फणसाळकर , प्रज्ञा सरवदे , जयजीत सिंग आणि सदानंद दाते यांची नावे राज्य सरकारने महासंचालक पदासाठी पाठवली होती, त्यातील तिघांची नावे काल केंद्राने निवडली होती असेही समजले मात्र राजकीय पार्श्वभूमी असलेल्या शुक्ला यांची नियुक्ती येत्या निवडणुकीच्या तोंडावर त्रासदायक ठरू शकली असती म्हणूनच या पदाचा तात्पूरता कारभार सध्या विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे अशी चर्चा आहे.
मुख्य सचिवपदी करिर
डॉ नितीन करीर यांची नियुक्ती राज्याच्या मुख्य सचिवपद करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आज सेवा निवृत्त झाले, त्यांना मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली होती.मात्र ती न मिळाल्याने सेवेत ज्येष्ठ असणाऱ्या डॉ करीर यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागात आणि विविध पदांवर डॉ करीर यांनी काम केल्याचा त्यांना अनुभव आहे.