शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख”
नंदुरबार, दि. २०: “निःस्वार्थ भावनेने समाजाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलीस बांधवांचे शौर्य, त्याग आणि सेवा भाव हेच त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे. त्यांचा त्याग व्यर्थ जाऊ नये, त्यांच्या कार्याची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी हे स्मारक उभारले आहे,” असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक व औकाफ मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
नंदुरबार येथे उभारण्यात आलेल्या पोलीस शहीद स्मारकाचे अनावरण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस. अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, डॉ. अभिजित मोरे, प्रतिभा शिंदे अन्य अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, “कर्तव्य पार पाडताना अनेक पोलीस बांधवांनी मृत्यूला सामोरे जात समाजाचे रक्षण केले. त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी उभारलेले हे स्मारक जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि पोलीस दलासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल.” त्यांनी पुढे सांगितले, “संरक्षण ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. देशाबाहेरील सीमांचे रक्षण सैनिक करतात तसेच देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी पोलीस दल पार पाडते. सामाजिक सुरक्षेसाठी पोलीस दल हेच विश्वासाचे प्रतीक आहे “पोलीस बांधवांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देऊ”
मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, “ज्या शहीदांनी प्राणार्पण केले त्यांची स्मारके निर्माण केलीच पाहिजेत, परंतु जे आजही दिवस-रात्र कर्तव्य बजावत आहेत त्यांच्यासाठीही चांगल्या सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या सर्व सुविधांसाठी भरीव तरतूद केली जाईल. त्याग,आदर आणि सेवाभावाचे स्फूर्तीस्थान म्हणजेच हे पोलीस शहीद स्मारक. नंदुरबार पोलीस दलाच्या प्रत्येक सदस्यासाठी हे स्मारक अभिमानाचे आणि जनतेसाठी विश्वासाचे प्रतीक ठरेल,”असा विश्वासही यावेळी पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी व्यक्त केला.ML/ML/MS