पोळा सणानिमित्ताने साज साहित्याने बाजार पेठ सजली

जालना, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) पोळा सणासाठी मातीचे बैल,गाय तसेच साज साहित्याने जालना बाजार पेठ सजलीय. सर्जा राजाकरिता साज खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. बैल पोळा सण उद्यावर येऊन ठेपलाय, शेतात वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा सण शेतकरीराजा साजरा करतो.
उद्यावर हा सण येऊन ठेपल्याने शेतकरी आपल्या लाडक्या सर्जा राजा साठी साज साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. पोळा सणानिमित्त बैलांना सजवण्यासाठी बाजारामध्ये शिंगासाठी रंग, पैंजण, चाळ पट्टा, कासरा, शिंग गोंडे, मणीमाळा, कासरे, पितळी चैन, मोरक्या, व्यसनी, घुंगरमाळ, बाशिंग, कवडी माळ, विविध रंगबिरंगी कासरे, गोंडे, सुत गंडे, घुंगर माळ जोड, विविध नक्षीकाम केलेल्या झुला, पितळी घंटा , पट्टे,कवड्याच्या माळा यासह आधी शोभेच्या वस्तूची दुकाने थाटली आहेत. पोळा सणासाठी बाजारात शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत असून पोळा सणाचा मोठा उत्साह शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे.
ML/SL/ML
1 Sept 2024