पोक्सो (POCSO) कायद्याविषयी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जनजागृती
मुंबई, दि १
लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण पोक्सो (Protection of Children from Sexual Offences Act) कायद्याविषयी जागरुकता वाढविण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या उपक्रम अंतर्गत मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील महानगरपालिका शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुला-मुलींना पोक्सो
कायद्याविषयी (POCSO) मार्गदर्शन करण्यात आले. या जनजागृती उपक्रमासाठी ‘अभया’ या विशेष नाटिकेचा आधार घेण्यात आला. संवादात्मक पद्धतीने सादर करण्यात आलेल्या या नाटिकेद्वारे सुरक्षितता, आत्मसंरक्षण, गैरवर्तन ओळखणे, योग्य प्रतिक्रिया, तक्रार नोंदविण्याची जबाबदारी आणि उपलब्ध कायदेशीर संरक्षण याबद्दल माहिती देण्यात आली.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मुलांना आणि मुलींना शालेय शिक्षण देत असताना त्यांना लैंगिक शिक्षण देणेही तितकेच गरजेचे आहे. हीच बाब अधोरेखित करून महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. पोक्सो कायद्याविषयी इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना गुड टच-बॅड टच, प्रसंगावधान राखणे, न घाबरता परिस्थितीचा सामना करणे अशा विविध स्व-संरक्षणाबाबत तसेच पोक्सो कायद्याबाबत अभया नाटिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मीना नाईकस् क्रिएटिव वर्कशॉप संस्थेमार्फत अभया ही नाटिका सादर करण्यात येत आहे. या नाटिकेला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
मुलींमध्ये ज्याप्रमाणे गुड टच बॅड टचबाबत जनजागृती करण्यात आली त्याचप्रमाणे ‘मुलांमध्ये लैंगिक समानता आणि आदर’ याबद्दल जागरुकता निर्माण करण्यात आली. जेणेकरून मुलेही लैंगिक असमानतेचे नकारात्मक परिणाम समजून घेतील आणि महिलांचा आदर करण्यास शिकतील. यासाठी मुलांमध्येही जनजागृती करण्यात आली.
दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ पासून ३ डिसेंबर २०२५ पर्यंत सदर कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत अभया नाटिकेचे १९ प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले आहे. उर्वरित प्रयोगांचे सादरीकरण हे नियोजित वेळेनुसार करण्यात येणार आहे. सदर नाटिकेमार्फत एकूण १० ते १२ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. पुढील नियोजनात चार हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये या नाटिकेद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे यांनी सांगितले.KK/ML/MS