विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली….
मुंबई दि ६ : राज्यातील विधानसभेच्या दोन जागांसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली असून बारामती मधून काँग्रेसने तर राहुरी मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपापले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणे जवळपास निश्चित झाले आहे.
आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बारामती मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळेला महायुतीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने या ठिकाणी उमेदवार न देण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कोणतीही स्पष्ट भूमिका न घेता सुनेत्रा पवार यांना पाठिंबा राहील अशा पद्धतीची वक्तव्य केली आहेत. मात्र काँग्रेस पक्षाने आकाश विजय मोरे यांची उमेदवारी जाहीर करत त्यांचा उमेदवारी अर्ज देखील आज दाखल करण्यात आला.
दुसरीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपाने उमेदवारी दिली असून त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून आज आपला अर्ज दाखल केला. त्यांच्यासमोर मागच्या निवडणुकीत निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर आयत्या वेळी तनपुरे यांनी आपली उमेदवारी भरली नाही. ही शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने गोविंद मोकाटे यांचा उमेदवारी अर्ज तयार ठेवला होता, तनपुरे यांच्या माघारीनंतर मोकाटे यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनामध्ये काँग्रेसवर टीका करण्यात आली असून एखाद्या निवडणुकीत काँग्रेसने फार आग्रह धरू नये असे वक्तव्य करण्यात आले आहे. याचा रोख थेटपणे बारामतीच्या पोटनिवडणुकीकडे आहे अशी चर्चा आहे. मात्र काँग्रेस पक्षाने आपल्याला कोणी शिकवण्याचा प्रयत्न करू नये अशी प्रतिक्रिया यावर व्यक्त केली आहे. एकूणच या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली असून या निवडणुकी अधिक चुरशीच्या होण्यासाठी दोन्ही बाजू नेमक्या प्रचाराला किती जोर लावतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.ML/ML/MS