राज्यातील महिला अधिकाऱ्यांचे प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून कौतुक
पालघर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला विकास आणि नारी सशक्तीकरणात महाराष्ट्र हा देशाला दिशा देण्याचं काम करत असल्याचं सांगून राज्यातल्या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुककेलं. पालघर येथे आयोजित वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभात प्रधानमंत्री मोदी यांनी राज्यातल्या महिला सशक्तीकरण आणि महिला अधिकाऱ्यांचं जाहीर सभेत कौतुक केलं.
मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातल्या अनेक उच्च पदांवर महिला अधिकारी अतिशय सक्षमपणे शानदार काम करत आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक या राज्यातल्या प्रशासनला मार्गदर्शन करत आहेत. पहिल्यांदाच राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला या नेतृत्व करत आहेत. पहिल्यांदाच राज्याच्या वन संरक्षण बलाच्या प्रमुखपदी सौमिता बिश्वास नेतृत्व करत आहेत. राज्याच्या विधी विभागाच्या प्रमुख म्हणून सुवर्णा केवले या जबाबदारी सांभाळत आहेत. राज्याच्या प्रधान अकाऊंटंट जनरल पदी जया भगत यांनी तर मुंबईतील कस्टम विभागाची धुरा प्राची स्वरूप सांभाळत आहेत. तर मेट्रो तीनचे नेतृत्व व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे करत आहेत असं ही त्यांनी सांगितलं.
उच्च शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात महिला नेतृत्त्व करत असल्याचं सांगत महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानेटकर आणि पहिल्या कौशल्य विकास विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला. अशा अनेक महत्त्वाच्या मोठ्या जबाबदारीच्या पदांवर महाराष्ट्रातल्या नारीशक्ती उत्कृष्ट कार्य करत आहेत . विसाव्या शतकातल्या नारीशक्ती समाजाला नवी दिशा देण्यासाठी तयार आहेत,ही नारीशक्तीच विकसित भारताचा मोठा आधार असल्याचं ही प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितलं.
ML/ML/SL
30 August 2024