वाढवण बंदर भूमिपूजन प्रसंगी मोदींनी मागितली शिवरायांची माफी

पालघर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ४० फूट पूर्णाकृती पुतळा सोमवारी (दि.२६) कोसळला त्यानंतर राज्याभरातील शिवप्रेमींमध्ये दु:ख, संताप आणि उद्रेकाची लाट निर्माण झाली तर सत्ताधारी आणि राजकारण्यांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. या दुर्दैवी घटनेबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागीतली आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून यावेळी बोलताना त्यांनी सिंधुदुर्गयेथील घटनेवर खेद व्यक्त करत भाष्य केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुख:द आहे. शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात, या घटनेमुळे त्यांच्या मनालाही जे वेदना झाल्या आहेत. मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो”.
२०१३ साली भाजपने जेव्हा मला पंतप्रधानपदाचे उमेदवार निश्चित केले तेव्हा मी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन बसलो होतो. तेथून मी माझ्या नव्या प्रवासाला सुरुवात केला होता, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘माझ्यासाठी आणि सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नाही आणि ते आमच्यासाठी दैवत आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
नरेंद्र मोदी यांनी यावेळी वाढवण बंदराचे वैशिष्ट विषद करत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली. २०१९ नंतर राज्यात आलेल्या सरकारने वाढवण बंदर उभारणीच्या कामात खोडा घातला होता, असा आरोप मोदींनी केला.
मोदी आपल्या भाषणात म्हणाले, ‘एक काळ होता जेव्हा भारत देश हा संपूर्ण जगात सर्वात शक्तिशाली मानला जात असे. सागरावर आमचं वर्चस्व होतं. सागरी महामार्गावरून होणाऱ्या व्यापाराला छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. ॲडमिरल कान्होजी आंग्रे यांनी ईस्ट इंडिया कंपनीविरोधात लढाई केली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर या वारशांवर फारसं लक्ष दिलं गेलं नाही, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण कोणकोणती पावलं उचलली हे मोदींनी यावेळी भाषणात नमूद केलं.
SL/ML/SL
30 August 2024