पार्श्वगायिका पामेला चोप्रा यांचे निधन
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी व प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका पामेला चोप्रा (७४) यांचं आज सकाळी निधन झालं. पामेला या चित्रपट लेखिका आणि निर्मात्या देखील होत्या. पामेला या यशराजचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा यांच्या मातोश्री होत्या. अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या त्या सासूबाई होत्या. पामेला त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती यशराज फिल्म्सने दिली आहे.
वृत्तानुसार, पामेला यांच्यावर 15 दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. न्यूमोनियामुळे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे.
यशराच फिल्म्सने एक स्टेटमेंट इन्स्टाग्रामवर जारी केलं आहे. त्यामध्ये पामेला यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. “जड अंतःकरणाने चोप्रा कुटुंब आपल्याला कळवत आहे की ७४ वर्षीय पामेला चोप्रा यांचं आज सकाळी निधन झालं. आज ११ वाजता मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुमच्या प्रार्थनांसाठी आम्ही आभारी आहोत व या कठीण प्रसंगात गोपनीयतेची विनंती करत आहोत,” असं त्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, पामेला चोप्रा अखेरच्या यशराज फिल्म्सची डॉक्युमेंटरी ‘द रोमॅंटिक्स’मध्ये दिसल्या होत्या. त्यात त्यांनी त्यांचे दिवंगत पती यश चोप्रा आणि त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले होते. रोमँटिक्समध्ये यश चोप्रा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल भाष्य करण्यात आलं होतं. तसेच पामेला यांच्याही योगदानाचा उल्लेख होता.
SL/KA/SL
20 April 2023