बांबू लागवड करा आणि मानवजात वाचवा
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सतत वाढणाऱ्या तापमानामुळे अन्नधान्याचे उत्पादन चाळीस टक्क्यांनी कमी होणार आहे तर दुसरीकडे हवेतील कार्बन चे प्रमाण प्रचंड वाढून मानव जात धोक्यात येणार आहे,त्यामुळे कार्बन उत्सर्जन करणाऱ्या गोष्टींना पर्याय असणाऱ्या बांबूची लागवड करा, सरकार त्याला रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत अनुदान देणार आहे .
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत विस्तृत माहिती देऊन बांबू लागवड करा असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. लागवड करणाऱ्यांकडून त्यांचे उत्पादन विकत घेण्याची शाश्वती देण्यासाठी उद्योजकांना यात सामावून घेण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
जगभरात वाढणाऱ्या तापमानामुळे अन्नधान्याचे उत्पादन ज्यात गहू, तांदूळ आणि दूध यांचा समावेश आहे ते २०३० सालानंतर चाळीस टक्क्यांनी घटेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सतत वाढणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे २०५० साली ते अत्युच्च पातळी म्हणजे ४५० ppm गाठून त्यानंतर माणसाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार आहे.या सगळ्यांवर उपाय एकच तो म्हणजे झाडे लावणे असे पटेल म्हणाले.
सगळ्यात कमी काळात म्हणजे अवघ्या तीन वर्षात बांबू पीक तयार होते आणि त्यातून अनेक फायदे आहेत. बांबू हा दगडी कोळशाचा पर्याय असून तितकाच उष्मांक उत्सर्जित करतो , त्यामुळे यापुढे कोळशाच्या जागी बांबूचे बायोमास वापरण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे, आपल्या राज्याला सध्या लागणारी वीज तयार करण्यासाठी आपण ५ लाख ९० हजार टन कार्बन डायऑक्साइड तयार करतो , हे अत्यंत घातक आहे. बांबू आणि शेतीतील इतर बायोमास वापरून हे कमी करण्याचे केंद्राचे धोरण आहे.
पूर्वी वन खात्याकडून बांबू तोडण्यास परवानगी घ्यावी लागत होती ती अट आता काढून टाकण्यात आली आहे. राज्य सरकारने एका हेक्टर बांबू लागवड करण्यासाठी सात लाख रुपये अनुदान देणार आहे. त्यासाठी विहीर घेतल्यास चार लाख तर शेततळे घेतले तर ६ लाख रुपये अनुदान देणार आहे असे पटेल यांनी सांगितले. त्यामुळे नदी , ओढे यांच्या शेजारील अथवा स्वतःच्या ओसाड पडलेल्या जागेवर शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी , ते उत्पादन विकत घेण्याची शाश्वती देण्यासाठी उद्योजकांना तयार केले जात आहे असेही पाशा पटेल यांनी यावेळी सांगितले. ऊस लागवडीसाठी पाण्याचा अतोनात वापर होतो आणि त्याउलट बांबू ला कमी पाणी लागते मात्र उसापेक्षा तीन पट अधिक इथेनॉल बांबू देतो असे ही ते म्हणाले.
ML/KA/SL
1 Dec. 2023