फौजदारी डाळ

 फौजदारी डाळ

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरभरे भरायला लागले किंवा हुरडा ओसरू लागला की शेतात फक्कड अशी खान्देशी मटन/ चिकन, फौजदारी डाळ – दाय (डाळ) गंडोरी, भरीत पुरी-वरण बट्टी अश्या पार्ट्या रंगतात…

साहित्य
3 टेबलस्पून सालाची उडीदडाळ
1 टेबलस्पून तुरीची डाळ
1 टेबलस्पून मुगाची डाळ
1 टेबलस्पून चणे डाळ
1 टेबलस्पून मसूर डाळ
1 टेबलस्पून चवळी
2 टेबलस्पून सुके खोबऱ्याचे पातळ काप
1/2 कप कांदा (साधारणतः एक मोठा) उभा चिरून
7 मोठ्या किंवा १२-१३ बारक्या लसूण पाकळ्या
बोटाच्या अर्ध्या पेरा इतके आले
1 टी-स्पून लाल तिखट
1/2 टी स्पून हळद
1 टी स्पून गरम मसाला

फोडणीसाठी
1 टी स्पून मोहरी
1/2 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
3-4 गोडलिंबाची पाने
3 टेबलस्पून तेल.

क्रमवार पाककृती: 

कृती :-
प्रथम सर्व डाळी तीन वेळा नीट धुवून अर्धा तास भिजत घालाव्यात, नंतर कुकरमध्ये ४ शिट्या करून शिजवून घ्याव्यात.

कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा

कांदा नीट परतला की त्यात खोबरे घालुन परत खोबरे लालसर होईस्तोवर परतून घ्यावे

आता ह्याच्यात बारीक चिरलेले आले लसूण घालून त्यांचा कच्चा वास जाईपर्यंत परतावे

आले लसूण परतून झाले का त्यातच एक चमचा लाल तिखट घालून चांगले परतून घ्यावे (पुन्हा एकदा जर ह्या स्टेपला घरच्यांनी सटासट शिंका मारल्या तर तुम्ही जिंकलेले आहात)

आता हा पूर्ण सौदा कढई उतरवून गार करून घ्यावा, नंतर त्यात अर्ध्या चमचा हळद आणि एक चमचा असल्यास खान्देशी काळा मसाला नसल्यास किचन किंग मसाला एक चमचा घालावा, आणि गार झालेल्या ह्या मसाल्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी.

आता कढईत 3 टेबलस्पून तेल गरम करावे त्यात मोहरी जिरे हिंग आणि गोडलिंबाची फोडणी करावी, आता ह्या फोडणीत आपण बारीक केलेले वरील वाटण घालावे अन चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे,

वाटणाला तेल सुटले की त्यात शिजवलेली डाळ घालून एकजीव मिक्स करावी, चवीनुसार मीठ घालावे आणि, ह्यात एक ग्लास गरम पाणी घालावे (एकच ग्लास कारण फौजदारी डाळ थोडी घट्टसरच असते)

पाणी घातल्यावर परत डाळ एकजीव करून तिला झाकून उकळी फुटू द्यावी, उकळी फुटली का गॅस बंद करून त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी डाळ दहा मिनिटे झाकून ठेवावी.

तयार आहे फौजदारी डाळ, सोबत काकडी टोमॅटो दाण्याचा कूट घालून केलेली कोशिंबीर आणि उडदाचेच कळणे घातलेली भाकरी अन गरम वाफाळता भात.

Phaujadari daal

ML/ML/PGB
27 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *