बिबटयांच्या नसबंदीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल
पुणे, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मानवी वस्तीत बिबट्या आढळून आल्याच्या घटना राज्यात अनेकदा घडून येतात. जंगलतोड, जंगलांच्या सीमेपर्यंत पसरलेल्या मानवी वस्त्यां यांमुळे बिबट्यांचे अधिवास कमी होऊ लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ऊस लागवड क्षेत्रामध्ये बिबट्यांचा आढळ आढळून येतो. त्यामुळे ऊसशेती नजिक राहणाऱ्या लोकांना नेहमीच सावध रहावे लागते. यामध्ये अनेकदा लहान मुलांना बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनाही उघडकीस येतात. बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्यात यावी अशी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात सध्या बिबट्याचा वावर वाढल्याने धोका निर्माण झाला असून या बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कारखान्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आंबेगाव, शिरुर या परिसरात सध्या बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे ते भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीतही येत आहेत. या बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी शासनातर्फे बिबट्यांची नसबंदी करणे आवश्यक आहे. यासाठी एड. तेजस देशमुख यांच्यातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. बिबट्याच्या नसबंदीचे निर्देश सरकारला देण्यात यावेत अशी मागणी यात करण्यात आली आहे.
SL/ML/SL
11 Oct. 2024