आग्रातील लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी

 आग्रातील लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी

नवी दिल्ली,दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राच्या किल्ल्यात घेतलेली औरंगजेबाची भेट आणि त्याला दिलेला सडेतोड जबाब, हा इतिहास तर सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच या विशेष प्रसंगामुळे महाराष्ट्राच्या मनात या प्रसंगाबाबत विशेष अभिमानाची भावना आहे. यामुळेच आग्र्यातील लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती. आता या ठिकाणी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्याचा मार्ग जवळपास मोकळा झालाय. दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत महत्वाचा निर्णय दिला आहे.

याचिका का दाखल झाली?

आग्रामधील लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरा करण्यासाठी पुरातत्व खात्याकडे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी परवानगी मागितली होती;  मात्र पुरातत्व खात्याच्या २००४ च्या नियमानुसार, खासगी संस्थेच्या कार्यक्रमाला विभागाने परवानगी देण्यास नकार दिला होता. विभागाच्या निर्णयाविरोधात पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

यापूर्वी आगाखान पुरस्कार कार्यक्रमासह अदनान सामीच्या कॉन्सर्टला आगरा किल्ला परिसरात पुरातत्व खात्याकडून परवानगी देण्यात आली होती. पंरतु, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे ११ नोव्हेंबर २०२२ पासून शिवजयंती उत्सव साजरी करण्यासाठी परवानगीकरीता प्रयत्न केले जात होते. अनेकवेळा पाठपुरावा करूनही शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने थेट उच्च न्यायालयातच दाद मागण्यात आली होती.

काय आहे दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

महाराष्ट्र सरकार या कार्यक्रमाचे सहआयोजक असतील; तर जयंती उत्सवाला परवानगी देण्यात कुठलीही हरकत नाही, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर शिवजयंती उत्सवासंबंधी राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SL/KA/SL

8 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *