देशात या राज्यातील लोक देतात सर्वांत जास्त शिव्या
भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक शिव्या दिल्या जातात हे तुम्हाला ठाऊक आहे का? यासंदर्भातील एक सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शिव्या दिल्या जातात या प्रश्नाचं उत्तर दिल्ली असं आहे. एका सर्वेक्षण अहवालात असे दिसून आले आहे की दिल्लीतील लोक सर्वात जास्त अपशब्द वापरतात. आया-बहिणींवरुन आणि मुलींना लक्ष्य करणारे अपशब्द राजधानीत सर्वात सामान्यपणे वापरल्या जातात. सर्वेक्षणानुसार, दिल्लीतील 80% लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात अपशब्द वापरतात.
सेल्फी विथ डॉटर फाउंडेशनचे संस्थापक आणि महर्षि दयानंद विद्यापीठातील प्रॅक्टिसचे प्राध्यापक डॉ. सुनील जगलान यांनी “गाली बंद घर अभियान” सुरू केले आणि या उपक्रमाचा एक भाग म्हणून वेगवेगळ्या राज्यांमध्ये दीर्घकालीन सर्वेक्षण करण्यात आलं. 11 वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 70 हजार लोकांकडून प्रतिसाद नोंदवण्यात आला. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या समाजिक स्तरांतील प्रतिनिधी होते. तरुण, पालक, शिक्षक, डॉक्टर, ऑटो चालक, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलिस, वकील, व्यापारी, स्वच्छता कर्मचारी, प्राध्यापक आणि पंचायत सदस्य यांचा समावेश होता.
सर्वाधिक शिव्या देणाऱ्या राज्यांमध्ये पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबमधील 78% लोकांनी आपण अपशब्द वापरल्याचे मान्य केले आहे. उत्तर प्रदेश (यूपी) आणि बिहार प्रत्येकी 74% लोकांनी आपण अपशब्द वापरतो असं म्हटलंय. राजस्थानमधील 68% आणि हरियाणा 62% लोकांनी आपण अपशब्द वापरत असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील 58% लोकांनी आपण अपशब्द वापरतो असं म्हटलं आहे. या यादीत महाराष्ट्र सातव्या स्थानावर आहे. त्याखालोखाल गुजरातमधील 55% लोकांनी अपशब्द वापरतो असं मान्य केलं आहे. मध्य प्रदेशमधील 48% आणि उत्तराखंड 45% लोकांनी आपण अपशब्द वापरत असल्याचं मान्य केलं आहे.
सर्वाधिक शिव्या देणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये जम्मू आणि काश्मीर सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. येथील फक्त 15% लोकांनी अपशब्द वापरल्याचे सांगितलं आहे.