या राज्यात १८ वर्षांवरील व्यक्तीला मिळणार नाही आधारकार्ड

गुवाहाटी, दि. २१ : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी आज घोषणा केली की, बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यापासून रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात १८ वर्षांवरील लोकांना पहिल्यांदाच आधार कार्ड मिळणार नाही. जर १८ वर्षांवरील लोकांना अद्याप आधार कार्ड मिळाले नसेल तर त्यांना फक्त एक महिन्याची मुदत दिली जाईल, असे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. तथापि, १८ वर्षांवरील चहा जमाती, अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना पुढील एक वर्षासाठी आधार कार्ड मिळत राहतील, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षभरात, आम्ही सीमेवरून देशात अवैधपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना सतत पकडत आहोत. काल देखील आम्ही त्यापैकी सात जणांना परत पाठवले. परंतु आम्हाला खात्री नाही की आम्ही त्या सर्वांना पकडू शकलो आहोत की नाही. म्हणून आम्हाला एक संरक्षण जाळे निर्माण करायचे आहे जेणेकरून कोणीही बेकायदेशीरपणे आसाममध्ये प्रवेश करू नये आणि आधार कार्ड घेऊन भारतीय नागरिक असल्याचे भासवून भारतात राहू नये. आम्हाला हे सर्व प्रकार बंद करायचे आहेत”, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे.