गणेशोत्सव मंडळांना प्रति खड्डा १५ हजार रुपये दंड

मुंबई, दि. २६ : महिन्याभरावर आलेल्या गणेशोत्सवानिमित्त रस्त्यावर खड्डे खोदल्यास मंडळांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंडपासाठी खड्डे खोदल्यास प्रति खड्डा १५ हजार रुपये खर्च आणि दंड आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या या जाचक अटींना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने कडाडून विरोध केला आहे.दरवर्षी गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडपासाठी खड्डे खोदले जातात. खड्डे पाडल्यास पालिकेकडून प्रतिखड्डा दंड आकारला जातो.
गेल्या वर्षी या कामासाठी प्रति खड्डा २ हजार रुपये आकारले जात होते. मात्र यंदा १५ हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव पुढे आल्यामुळे मंडळांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.मंडप उभारणीसाठी कधीकधी तात्पुरते खड्डे खोदावे लागतात, परंतु त्यासाठी इतकी मोठी रक्कम आकारल्यास सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर आणि मंडळांवर मोठा आर्थिक ताण येणार असल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी म्हटले आहे. अतिरिक्त दंड आकारण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी पालिकेकडे केली आहे.