ॲड. डॉ.नीलेश पावसकर यांची ईडीच्या वरिष्ठ वकील पॅनलवर नियुक्ती.

मुंबई, दि. २ : कायदा क्षेत्रातील प्रख्यात विधिज्ञ ॲड. डॉ. नीलेश वैजयंती भगवान पावसकर यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ वकील पॅनलवर मुंबई उच्च न्यायालयात प्रतिष्ठेची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विधिजगतासह विविध सामाजिक संस्थांकडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
डॉ. पावसकर यांनी महाराष्ट्र शासनासाठी विशेष सरकारी वकील आणि सरकारी अधिवक्ता म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. राज्य शासनाने तयार केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, २००३ आणि सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा, २०१५ यांच्या मसुदा समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, या दोन्ही महत्त्वाच्या कायद्यांच्या अंतिम स्वरूपात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही डॉ. पावसकर यांनी आपली छाप पाडली आहे. त्यांनी मुंबईतील सरकारी कायदा महाविद्यालयात मानद प्राध्यापक म्हणून कार्य केले. तसेच सिध्दार्थ लॉ कॉलेज (माटुंगा), न्यू लॉ कॉलेज (पार्ले) आणि जे. सी. लॉ कॉलेज अशा नामांकित महाविद्यालयांत सलग अठरा वर्षे मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत राहून असंख्य विद्यार्थ्यांना कायदाशास्त्रातील सखोल ज्ञान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध न्यायालयांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
कायद्यावरील भक्कम पकड आणि समृद्ध अनुभवामुळे भारत सरकारने त्यांची वरिष्ठ वकील म्हणून उच्च न्यायालयात निवड केली होती. शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी भारतीय राज्यघटना, प्रशासकीय कायदा आणि हिंदू कायदा या विषयांत पदव्युत्तर पदवी (एल. एल. एम.) संपादन केली असून भ्रष्टाचारविरोधी कायदा या विषयावर त्यांनी विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी मिळविली आहे.ML/ML/MS