पवारांचा राज्यातील वारसदार आता रोहित

 पवारांचा राज्यातील वारसदार आता रोहित

नागपूर, दि. 10 (मिलिंद लिमये) :अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पाडून भाजपा सोबत संसार मांडल्यानंतर आणि खरा पक्ष आपलाच असा दावा केल्यानंतर राज्यात त्यांच्या निमित्ताने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी रोहित पवार यांना पुढे आणले जात असून नागपुरात मंगळवारी होणाऱ्या संघर्ष यात्रेच्या समारोपातून हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजित पवार यांनी एकहाती पक्षाची राज्यातील धुरा सांभाळली होती, सुप्रिया सुळे यांना खासदारकी दिल्यानंतर हळूहळू त्यांना राजकीय वारस ठरविण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला तरीही सत्तेची महत्त्वाची पदे कायमच अजित पवारांना मिळाली , त्यामुळेच सत्तेतून आलेली ताकद त्यांना पक्षातही महत्त्वाचे स्थान देत गेली. कार्यकर्त्यांची आर्थिक ताकद वाढविण्याचे काम अजितदादांनी यातून सतत केले त्यामुळे त्यांच्या निष्ठाही काळाच्या ओघात अजितदादांकडेच जास्त झुकल्या.

शरद पवार कायमच देशाच्या राजकारणात गुंतून पडले होते, राज्याच्या राजकारणात त्यांनी अजितदादांना खुली सूट दिली होती. मात्र गेल्या काही वर्षात त्यांना अजित पवार यांच्या वरील विश्वास कमी राहिल्याचे दिसून आले होते. भाजपा सोबत जाण्याचा प्रयत्न त्यांनीही केल्याचे अनेकवेळा दाखविले आणि केंद्रात सुप्रिया सुळे यांच्या साठी मंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती अशी चर्चा खूप वेळा झाली.

प्रत्यक्षात २०१९ साली भाजपकडे आवश्यक संख्येचा तुटवडा निर्माण झाल्यावर एकीकडे अजितदादांना भाजपशी बोलणी करण्यासाठी पाठवले तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांच्या सोबत सत्ता स्थापन करीत अडीच वर्षाने सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचे गणित मांडल्याचे पाहायला मिळाले मात्र भाजपाने ते स्वप्न अर्धवटच तोडले.

या पार्श्वभूमीवर अजितदादा आणि थोरले पवार यांच्यात निर्माण झालेली दरी अधिक रुंदावली होती आणि त्याचीच योजना म्हणून बहुदा थोरल्या पवारांनी पार्थ ऐवजी रोहित पवार यांना आपल्या जवळ घेत आमदारकीचे तिकीट दिले असावे. पाच महिन्यांपूर्वी अजितदादांनी वेगळा विचार केल्यावर रोहित पवार आक्रमक झाल्याचे दिसून आले आणि त्यांनी तशा प्रतिक्रिया द्यायला सुरुवातही केली होती.

आता थोरल्या पवारांनी सुप्रिया सुळे यांना एक पाऊल मागे ठेवत राज्यातल्या राजकारणात रोहित पवार यांना पुढे आणण्यासाठी संघर्ष यात्रा काढायला सांगत संघटन कौशल्य सिद्ध करण्याची आणि त्यानिमित्ताने त्यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्याची संधी दिली आहे. यानिमित्ताने राज्यातील अनेक विभाग आणि कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून त्यांची माहिती घेण्याची कामगिरी रोहित पवार यांनी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे, या यात्रेचा समारोप थोरल्या पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी नागपुरात बारा डिसेंबर रोजी होत आहे त्याचनिमित्ताने नव्या पवारांचा राज्यात उदय होतो का ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. Pawar’s heir in the state is now Rohit

ML/KA/PGB
10 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *