‘एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा
मुंबई, दि. ११ :- पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या संगमातून केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर जबाबदार वृत्तनिर्मितीची नवीन मानसिकता घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कौशल्य,रोजगार,
उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी केले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृत्तपत्र तसेच डिजिटल माध्यम पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रशिक्षण कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी वर्मा बोलत होत्या. या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ.अपूर्वा पालकर, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे दिलीप सपाटे तसेच वृत्तपत्रे, डिजिटल मीडिया आणि न्यूज एजन्सीजमधील पत्रकार उपस्थित होते.
अतिरिक्त मुख्य सचिव वर्मा म्हणाल्या की, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण हे सर्वांसाठी एकसारखे नसावे. प्रत्येकाचा अनुभव आणि तांत्रिक प्रावीण्य ओळखून प्रशिक्षण याची रचना संरचित केले पाहिजे. केवळ साधनांची ओळख न देता, त्यांचा हॅन्ड्स-ऑन वापर शिकविणे ही खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षणामध्ये ‘एआय’ इन न्यूज ब्रॉडकास्टिंग, ‘एआय’ एथिक्स इन रिपोर्टिंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, फॅक्ट चेकिंग, ट्रान्सलेशन टूल्स, चॅट जीपीटी, ग्रामर्ली, गुगल ट्रान्सलेट अशा अनेक प्रायोगिक सत्रांचा समावेश आहे. प्रशिक्षणाच्या प्रत्येक दिवशी शिकण्याचा आलेख चढता राहील आणि शेवटच्या दिवशी सहभागी अधिक आत्मविश्वासाने ‘एआय’चा वापर करू शकणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्तेवरील हे प्रशिक्षण केवळ कोर्स म्हणून नव्हे, तर ज्ञानयुगाच्या नव्या दिशेने उचललेले पाऊल म्हणून घ्या. जगभरातील न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन, पीटीआय, हिंदुस्तान टाइम्स यांसारख्या माध्यमांनी एआयचा अंगीकार केला आहे. महाराष्ट्रातील पत्रकारितेलाही हे नवे युग आत्मसात करावे लागेल.
आपले उद्दिष्ट केवळ तांत्रिक प्रगती नसून, एथिकल जर्नालिझमच्या मूल्यांसह तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर करणे हे असले पाहिजे. लोकशाही संस्थांना बळकट करण्यासाठी माध्यमांची भूमिका अधिक प्रभावी व्हावी, यासाठी ‘एआय’चे ज्ञान अत्यावश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ‘आर्टिफिशियल ब्रेन’
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘आर्टिफिशियल ब्रेन’. जसे मानवी मेंदूत मेमरी आणि प्रोसेसिंग या दोन प्रक्रिया चालतात, तसेच हे कृत्रिम मेंदूचे काम आहे. पण या आर्टिफिशियल ब्रेनचा उपयोग करताना मानवी बुद्धिमत्तेचा हस्तक्षेप कायम ठेवणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. अपूर्वा पालकर यांनी केले.
कुलगुरू डॉ.पालकर म्हणाल्या की, आजच्या काळात ‘एआय’चा योग्य आणि जबाबदार वापर महत्त्वाचा आहे. चुकीचा वापर केल्यास चुकीची माहिती, फेक न्यूज आणि असत्यता पसरू शकते, हे आपण माध्यमांमध्ये पाहतो आहोत. त्यामुळे ‘एआय’च्या वापराबाबत कायदेशीर आणि नैतिक पैलूंचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ.पालकर म्हणाल्या की, पत्रकारितेच्या दृष्टीने पुढील पाच वर्षांत मोठे बदल घडतील. त्यामुळे सर्व पत्रकारांनी ‘एआय’ शिकणे अत्यावश्यक आहे. ‘एआय’ म्हणजे शेवटी डेटा आहे, जितका जास्त आणि शुद्ध डेटा आपण दिला, तितके चांगले आणि विश्वासार्ह परिणाम आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी फॅक्ट चेकिंग, ट्रान्सलेशन, कंटेंट प्रेझेंटेशन यांसारख्या बाबतीत ‘एआय’ टूल्सचा अभ्यास करावा.
आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ‘एआय’च्या मदतीने व्हॉइसओव्हर, स्क्रिप्टिंग, व्हिडिओ तयार करणे अशा अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. मात्र, ‘एआय’ कितीही प्रगत झाले तरी मानवी संवेदनशीलता आणि विचारशक्ती अपरिहार्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे सरचिटणीस दीपक भातुसे यांनी सूत्रसंचालन केले.ML/ML/MS