पतंजलीची सोन पापडीही गुणवत्ता चाचणीत अपयशी
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या औषधांमुळे असाध्य आजार बरा होत असल्याचा खोटा दावा केल्या प्रकरणी पतंजली आयुर्वेदचे रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वीच न्यायालयात माफी मागीतली. त्यानंतर त्यांच्या विविध FMCG उत्पादनांच्या गुणवत्तेबतही तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. आयुर्वेदिक औषधे, FMCG वस्तूंबरोबरच मिठाई उद्योगातही उतरलेल्या पतंजलीली आज उत्तराखंड न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत नापास झाल्याप्रकरणी उत्तराखंडमधील न्यायालयाने कंपनीच्या सहायक महाव्यवस्थापकासह तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 च्या कलम 59 अंतर्गत ही शिक्षा देण्यात आली आहे.
या तीन लोकांमध्ये अभिषेक कुमार, असिस्टंट जनरल मॅनेजर, पतंजली फूड अँड हर्बल पार्क, लक्सर, अजय जोशी, असिस्टंट मॅनेजर, कान्हा जी डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड, रामनगर; व दुकानदार लीलाधर पाठक यांचा समावेश आहे. पिथौरागढचे मुख्य दंडाधिकारी संजय सिंह यांनी ही शिक्षा सुनावली आहे. 17 सप्टेंबर 2019 रोजी पिथौरागढ जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी यांनी बेरीनाग मार्केटमधील दुकानातून पतंजली नवरत्न वेलची सोन पापडीचे नमुने गोळा केले. रुद्रपूर येथील प्रयोगशाळेत गुणवत्ता चाचणीत ते नापास झाले होते. त्यानंतर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी उत्तराखंड सरकारने पतंजली आयुर्वेद आणि दिव्या फार्मसीच्या 14 उत्पादनांचा परवाना रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. शुक्रवारी (17 मे) राज्य सरकारने या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. उच्चस्तरीय समितीने प्राथमिक तपास अहवाल सादर केल्यानंतर सरकारने आपला आदेश स्थगित ठेवला आहे. उत्तराखंड सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सचिव पंकज कुमार पांडे यांनी एका आदेशात ही माहिती दिली आहे.
SL/ML/SL
20 May 2024