अनधिकृत पार्किंगमुळे अग्निशमन व विमोचन कार्यात अडथळा आल्यास संबंधित वाहनधारकांवर थेट एफआयआर नोंदविणार

 अनधिकृत पार्किंगमुळे अग्निशमन व विमोचन कार्यात अडथळा आल्यास संबंधित वाहनधारकांवर थेट एफआयआर नोंदविणार

मुंबई, 2
मुंबईतील नागरिकांच्या जीवित संरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाच्या बचाव कार्यात अनधिकृत वाहन पार्किंगमुळे अडथळे निर्माण होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर, आगीच्या किंवा आपत्तीच्या घटनास्थळी शीघ्र प्रतिसाद देण्यात अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनमालकांवर पोलिस स्थानकात थेट प्रथम खबरी अहवाल अर्थात एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) नोंदविण्यात येणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती (डॉ.) अश्विनी जोशी यांनी संबंधित कारवाईबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. याबाबत महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या चर्चेनंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल हे मुंबईतील नागरिकांसह, प्राणी, पक्ष्यांच्या जीविताचे तसेच वित्ताचे आगीच्या दुर्घटना तसेच अन्य नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीपासून संरक्षण करण्याचे कर्तव्य बजावत असते. अग्निशमन व विमोचन कार्य प्रभावीपणे राबविण्यासाठी दुर्घटनास्थळी अग्निशमन दलाची सुसज्ज वाहने, प्रगत साधनसामुग्री व कुशल मनुष्यबळ इत्यादींद्वारे शीघ्र प्रतिसाद देण्यासाठी घटनास्थळी धाव घेत असतात.

मात्र, मागील काही वर्षापासून असे अनुभवास येत आहे की, मुंबई महानगरात रस्त्यांच्या कडेला नागरिकांद्वारे अनेक प्रकारची वाहने अनधिकृतरित्या उभी (पार्क) केलेली असतात. अशाप्रकारच्या वाहनांमुळै प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी शीघ्र प्रतिसाद देण्यास किंवा पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांमुळे अग्निशमन व विमोचनाचे कार्य करतांना अनेक अडचणी येतात व ते कार्य प्रभावीपणे राबविता न आल्याने जीवित व वित्त हानीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढू शकते. ही बाब अतिशय गंभीर आहे.

मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कडेला नागरिकांकडून अनधिकृतरित्या वाहने उभी (पार्क) केली जातात. जेव्हा एखादा आपत्तीप्रसंग उद्भवतो तेव्हा मुंबई अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी वेळेत पोहोचणे अथवा प्रत्यक्ष कार्यवाही करताना अडचणी येतात. परिणामी जीवित व वित्तहानीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

याप्रकाराची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी प्रखरतेने गंभीर दखल घेतली आहे. आगीच्या किंवा आपत्तीच्या ठिकाणी जीवितहानी, वित्तहानी अथवा जखमींचे प्रमाण लक्षणीय असेल आणि अनधिकृतरित्या उभ्या (पार्क) केलेल्या वाहनांमुळे अग्निशमन व विमोचन कार्यात विलंब झाल्याचे आढळून आल्यास, संबंधित अग्निशमन वाहनावरील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने अग्निशमनाचे कार्य पूर्णपणे संपल्यानंतर बचावकार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनाचे नोंदणी क्रमांकासह छायाचित्रे काढून वरिष्ठांच्या परवानगीने संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार प्रथम खबरी अहवाल अर्थात एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे अनधिकृतरित्या वाहन पार्क करण्यास प्रतिबंध होवून नागरिकांमध्ये जागृती निर्माण होईल व दुर्घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलास शीघ्र प्रतिसाद देता येईल. मदत कार्यातील विलंब टळेल. तसेच मुंबई अग्निशमन दलास विमोचन कार्य प्रभावीपणे राबविता येईल.

तक्रार आल्यास पोलिसांकडे वर्ग करणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या कारवाईमुळे मुंबईतील नागरिकांकडूनही अनधिकृत पार्किंगबाबत मुंबई अग्निशमन दलाकडे तक्रार येण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कार्यप्रणाली ठरविली आहे. अशाप्रकारच्या अनधिकृत पार्किंगबाबत जर नागरिकांनी तक्रार केली, तर संभाव्य तक्रार संबंधित पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस विभाग व संबंधित विभाग कार्यालयाकडे योग्य कारवाईसाठी वर्ग करून तक्रारदारास माहिती देण्याचे निर्देशही मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र अंबुलगेकर यांनी दिली आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *