Paris Olympic – बॅडमिंटनपटू लक्ष सेन सामना जिंकूनही विजयापासून वंचित
पॅरिस,दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेमबाज मनू भाकरेने कांस्य पदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे पदांचे खाते उघडले आहे. त्यानंतर आता अन्य खेळांडूंच्या कामगिरीकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागले आहे. यातच आपला बॅडमिंडनपटू लक्ष सेन याने सामना जिंकूनही त्याला विजयी घोषित करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात विजयाने केली. लक्ष्य सेनने गट फेरीतील आपल्या पहिल्या सामन्यात केविन कॉर्डनचा पराभव केला. मात्र, लक्ष्य सेनचा सामना आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने हटवला आहे, या सामन्याचे गुण आता गृहित धरेल जाणार नाहीत. काल सायंकाळी या निर्णयाची माहिती देण्यात आली. पहिला गेम 21-8 असा जिंकल्यानंतर लक्ष्यने दुसरा गेम 22-20 असा जिंकला. यानंतरही 22 वर्षीय लक्ष्य सेनचा विजय रेकॉर्डमधून हटला आहे. आता उरलेल्या दोन सामन्यांवरून लक्ष्यचे रँकिंग निश्चित होईल.
भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या गट एल मधील सलामीच्या सामन्यात केविन कॉर्डनवर मिळवलेला विजय गणला जाणार नाही. केविन कॉर्डन हा डाव्या कोपराच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्वाटेमालाचा पुरुष एकेरी बॅडमिंटनपटू केविन कॉर्डनने डाव्या कोपराच्या दुखापतीमुळे पॅरिस २०२४ ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतली आहे, असे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (BWF) एका अपडेटमध्ये म्हटले आहे.
इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टी आणि बेल्जियमच्या ज्युलियन कारागी यांच्या विरुद्ध एल गटातील त्यांचे उर्वरित सामने खेळवले जाणार नाहीत. या गटातील सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. बॅडमिंटनच्या जागतिक मंडळाने सांगितले की गट एल मधील सामने गट टप्प्यासाठी BWF च्या स्पर्धा नियमांनुसार कॉर्डनसह खेळले गेले. त्यामुळे, गट एल मधील कॉर्डनचा समावेश असलेल्या किंवा खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे निकाल आता रद्द मानले जातील. कॉर्डनने माघार घेतल्याचा अर्थ आता ग्रुप एलमध्ये फक्त तीन खेळाडू असतील, ज्यात लक्ष्य सेन, क्रिस्टी आणि कॅरागी यांचा समावेश आहे. अशाप्रकारे या गटात लक्ष्य हा एकमेव खेळाडू असेल जो तीन सामने खेळेल. लक्ष्य सेन आता सोमवारी कॅरागी आणि बुधवारी त्याच्या अंतिम गट सामन्यात क्रिस्टीशी भिडणार आहे.
सात्विक- चिराग जोडीचा सामनाही रद्द
जर्मनीचा खेळाडू मार्क लॅम्सफसने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा पुरुष दुहेरीतील क गटातील सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय जोडी सोमवारी लॅम्सफस आणि मार्विन सीडेल या जर्मन जोडीविरुद्ध सामना खेळणार होती. जर्मन पुरुष दुहेरी खेळाडू मार्क लॅम्सफसने गुडघ्याच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे, असे BWF ने म्हटले आहे.
लॅम्सफस आणि त्याचा साथीदार मार्विन सीडेल यांचे भारताचे सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी आणि फ्रान्सचे लुकास कॉर्वे आणि रोनन लाबर (३० जुलै २०२४) यांच्या विरुद्ध गट C चे सामने यापुढे खेळवले जाणार नाहीत. सात्विक आणि चिराग यांनी शनिवारी लुकास कॉर्वी आणि रोनन लाबर या फ्रेंच जोडीवर २१-१७, २१-१४ असा विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. या भारतीय जोडीचा मंगळवारी गटातील अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांतो यांच्याशी सामना होईल. जर्मन जोडीने माघार घेतल्याने इंडोनेशियन जोडीने शनिवारी लॅम्सफस आणि सीडेल यांच्यावर मिळवलेला विजय निकालातून काढून टाकण्यात आला आहे.
SL/ML/SL
29 July 2024
दरम्यान आज तिरंदाजीमध्ये भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना तुर्कीविरुद्ध होता. मात्र भारतीय संघाला हा सामना जिंकण्यात अपयश आलं. भारताने पहिला सेट गमावला आहे. भारताने ५३ तर तुर्कीने ५७ गुण मिळवले. दुसऱ्या सेटमध्ये भारताने ५२ तर तुर्कीने ५५ स्कोअर केला. तिसरा सेट भारताने एका अंकाने जिंकला. भारताने ५५ तर तुर्कीने ५४ स्कोअर केला आहे. तर अखेरच्या सेटमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे.
SL/ML/SL
29 July 2024