खेलो इंडिया साठी पुण्यातील पॅरा नेमबाज
पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील पॅरा नेमबाज खेळाडू नरेंद्र गुप्ता आणि राघव बारावकर यांची ८ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या खेलो इंडियासाठी निवड झाली आहे. त्यांची निवड १० मीटर एअर रायफल एस एच २ गटात झाली आहे.
दिव्यांग नागरिकांमध्ये नेमबाजी या महागड्या खेळाची जनजागृती प्रचार प्रसार आणि आवड निर्माण होवून त्यांनी नेमबाजी खेळाचे प्रशिक्षण घेऊन आपल्या शहराचे राज्याचे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी पुणे महानगर पालिका तसेच पॅरा टार्गेट शुटिंग असोसिएशन , पुणे यांनी संयुक्तपणे पुणे जिल्हास्तरीय पॅरा नेमबाजी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये हे दोन्ही खेळाडू सहभागी झाले होते.
जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी केल्यामुळे त्यांची निवड मोफत प्रशिक्षण आणि पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. पुणे महानगर पालिकेने त्यांना नेमबाजी साहित्यासाठी अर्थसहाय्य केले आणि पॅरा नेमबाज प्रशिक्षक आकाश कुंभार यांनी मोफत प्रशिक्षण दिले. पाच महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन ते डिसेंबर मध्ये इंदौर येथे झालेल्या पूर्व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. पूर्व राष्ट्रीय स्पर्धेत नरेंद्र गुप्ता यांनी कांस्यपदक पटकावले तसेच दोन्ही खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाले. Para shooter from Pune for Khelo India
राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांची निवड भारतीय संघाच्या निवड चाचणीसाठी झाली होती त्यामुळे त्यांची निवड पहिल्या पॅरा खेलो इंडियासाठी झाली आहे. पुणे महानगर पालिके कडून आयुक्त विक्रमकुमार तात्कालीन क्रिडा उप आयुक्त संतोष वारुळे समाज विकास उप आयुक्त नितीन उदास , पॅरा टार्गेट शुटिंग असोसिएशन पुणे चे अध्यक्ष रफीक खान , पॅरा नेमबाज प्रशिक्षक आकाश कुंभार यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. दरवर्षी होतकरू पॅरा खेळाडूंची निवड करून त्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे पॅरा नेमबाज प्रशिक्षक आकाश कुंभार यांनी सांगितले.
ML/KA/PGB
16 Sep 2023