खांदाडमध्ये दुर्मीळ पँगोलिन मांजर सापडले.

अलिबाग दि२१– रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खांदाड गावात एका अत्यंत दुर्मीळ प्राण्याचा पँगोलिन मांजर काही तरुणांना दिसला. हा प्रकार खरोखरच आश्चर्यजनक आणि दुर्मीळ असल्याने गावात एकच खळबळ उडाली. खांदाड गावातील काही तरुणांनी गावातल्या एका घराच्या शेजारी असणाऱ्या कोपऱ्यात विचित्र हालचाल पाहिली.
तेथे पाहणी केली असता, ते एक वेगळ्याच प्रकारचा प्राणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या प्राण्याची हालचाल आणि शरीररचना पाहून त्यांनी तातडीने स्थानिक लोक आणि वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सावधगिरीने त्या प्राण्याला ताब्यात घेतले. पुढील तपासणीत तो प्राणी पँगोलिन (Pangolin) असल्याचे स्पष्ट झाले.

पँगोलिन हा अत्यंत दुर्मीळ आणि संरक्षित प्रजातीतील प्राणी असून, त्याचा आंतरराष्ट्रीय नैसर्गिक संवर्धन यादीत समावेश आहे. भारतात तो वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित प्राणी मानला जातो. या घटनेनंतर संपूर्ण खांदाड गावात एकच चर्चा सुरू झाली.
परिसरातील नागरिक प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू लागले. गावातील वातावरणात एकप्रकारची उत्सुकता आणि आश्चर्य पसरले होते. सध्या हा दुर्मीळ प्राणी वनविभागाच्या देखरेखीखाली असून, त्याच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे. ML/ML/MS