पंढरपूरच्या वारीवर अन्न,औषध प्रशासनाची करडी नजर

मुंबई, दि 6 – राज्यातील विविध वारकरी दिंड्या पंढरीच्या वारीला जात असतात. वाटेत मुक्काम किर्तन करताना त्यांच्या अल्पोपहार व भोजनदानाची सोय विविध संस्था संघटनाकडून करण्यात येते. लाखो लोक एकत्र येण्याची संधी साधून अन्न पदार्थात भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारच्या अन्न व औषधी प्रशासन विभाग अन्न पदार्थ विक्री व खरेदीवर करडी नजर ठेवणार अशी माहिती अन्न व औषधी द्रव्य प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
वारकरी संप्रदायाच्या वतीने राज्यातील शेकडो वारकरी दिंड्या पंढरपूरच्या दिशेने पायी विठू रायाचा गजर करीत मार्गक्रमण करीत असतात. या वारकऱ्यांच्या दिंड्या तसेच विविध सामाजिक संस्था संघटनांच्यावतीने अन्नदान वाटप केले जाते. या संधीचा फायदा घेऊन दुध तेल तुप डालडा व इतर पदार्थामध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक पाहता पवित्र कार्यात भेसळ करू नये पण काही असामाजिक तत्व लभात घेता अन्न पदार्थ विक्रीवर विभागामार्फत करडी नजर ठेवण्यात येणार आहे. ठिकठिकाणी वारी मार्गावर फूड सेफ्टी व्हॅन ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले. मुक्कामी ठिकाणी होणाऱ्या किर्तनाच्या कार्यक्रमात भेसळ रोखण्या विषयी प्रबोधन करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधून नविन १८९ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यस्तरीय जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.तसेच फुड सेफ्टी सायन्स इन एक्शन या संकल्पनेवर आधारीत विविध चर्चा सत्र तज्ञांचे विचार अन्न सुरक्षा संबंधीत उपक्रमाचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील ५ स्टार आणि ७ स्टार हॉटेल तपासणीचे अधिकार केंद्र शासनाकडे आहेत ते राज्याकडे असावेत त्या विषयी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे तसेच या विभागाचे बजेट वाढविण्यात यावे याकरीता वित्त व नियोजन विभागाकडे तसेच मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.