पंचगंगा धोका पातळीच्या जवळ, ४४ रस्ते बंद

 पंचगंगा धोका पातळीच्या जवळ, ४४ रस्ते बंद

कोल्हापूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळता
चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी धरण आणि नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवांधार पावसानं पंचगंगेची पाणी पातळी इशारा पातळीवरून आता धोका पातळीच्या समीप आली आहे. पंचगंगेनं आज सकाळी सहा वाजता 40.8 फूट पातळी गाठली.

पंचगंगा इशारा पातळी
ओलांडून आता धोक्याच्या पातळीकडे चालली आहे.
यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
काही भागातील नागरिकांनी स्थानांतरण सुरू केलं आहे.
8 राज्यमार्ग, 16 प्रमुख जिल्हा मार्ग, 6 इतर जिल्हा मार्ग आणि 14 ग्रामीण मार्ग असे एकूण 44 मार्ग पाणी आल्यानं बंद आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

कोल्हापूर-गगनबावडा मार्ग मात्र अद्याप बंदच होता; तर इचलकरंजीचा कर्नाटकशी रात्री उशिरा संपर्क तुटला. पंचगंगा पाणी पातळीत वाढ सुरूच असून, ती 43 फूट या धोका पातळीकडे चालली आहे.
78 बंधारे अद्याप पाण्याखालीच आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 22 ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंदच असून अणुस्कुरा मार्गावर वरणमळी इथे आलेलं पाणी ओसरल्यानं मलकापूर- अणुस्कुरा हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला. मात्र, काटे-करंजफेण मार्गावर अद्याप पाणी असल्यानं कळे-बाजारभोगावमार्गे अणुस्कुरा हा मार्ग आजही
बंद आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 51.3 मि.मी. पाऊस
झाला. शाहूवाडी (92), पन्हाळा (76.3) आणि गगनबावड्यात (70.2) अतिवृष्टी झाली. कोल्हापूर
शहरातही अतिवृष्टी झाली असून, 68 मि.मी. पाऊस झाला. चंदगड तालुक्यात
59.1 मि.मी.,राधानगरीत 56.5 मि.मी., करवीरमध्ये 54.9 मि.मी., कागलमध्ये 44.4 मि.मी.,भुदरगडमध्ये 43.8 मि.मी., आजऱ्यात 43.4 मि.मी., हातकणंगलेत 40.7 मि.मी., शिरोळमध्ये
25.4 मि.मी., तर गडहिंग्लज तालुक्यात 23.6 मि.मी. पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील 22 ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख 16 धरणांपैकी चिकोत्रा (50 मि.मी.) आणि आंबेओहळ ( 32 मि.मी.) वगळता
उर्वरित 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टीची नोंद झाली.
कोदे धरण क्षेत्रात 264 मि.मी., तर तुळशी परिसरात 239 मि.मी. पाऊस झाला.
जंगमहट्टीत 84 मि.मी.पाऊस झाला. अन्य 11 धरण क्षेत्रांत 100 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला. राधानगरी 85 टक्के भरले असून 13 धरणांतून विसर्ग सुरू आहे.
जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ आणि कोदे ही पाच धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.

राधानगरी धरण 85 टक्के भरलं. वारणा धरणही 80 टक्के भरलं आहे. यामुळे धरणातील वक्राकार दरवाजातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
चिकोत्रा, दूधगंगा आणि तुळशी वगळता उर्वरित सर्व 13 धरणांतून पाण्यांचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावरून सकाळी 51 हजार 207 क्युसेक विसर्ग सुरू होता. दुपारनंतर तो 55 हजार 539 क्युसेक्स इतका वाढला.

पन्हाळा तालुक्यातील आंबर्डे इथल्या दरड प्रवण क्षेत्रातील
दोन कुटुंबातील 16 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
यासह कोल्हापूर शहरातील
सुतारवाडा परिसरातील 4 कुटुंबातील 20 नागरिकांना स्थलांतरित केले आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात विविध ठिकाणी 51 घरांची पडझड झाली.

ML/ML/PGB 23 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *