पाक विश्वचषकात खेळणार पण भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार
मुंबई, दि. २ : आगामी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाला विश्वचषकात खेळण्याची परवानगी दिली असली, तरी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या गट साखळीतील सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर केले, ज्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. यामुळे पाकिस्तानला मिळणारा आयसीसीच्या वार्षिक महसुलातील वाटा (सुमारे 34.5 दशलक्ष डॉलर्स) रोखला जाऊ शकतो.
पाकिस्तान सरकारने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “पाकिस्तानचा संघ टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी होईल, परंतु १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार नाही.” या निर्णयामागे कोणतेही ठोस कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्यावर पाकिस्तानने आयसीसीमध्ये बांगलादेशची बाजू घेतली होती, जी इतर देशांनी फेटाळून लावली होती.
पाकिस्तानच्या या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) अत्यंत संतप्त आहे. आयसीसीने म्हटले आहे की, कोणत्याही संघाला जागतिक स्पर्धेत स्वतःच्या आवडीनुसार सामने खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. जर पाकिस्तान भारताविरुद्ध खेळला नाही, तर तो सामना प्रतिस्पर्धी संघाला (भारत) बहाल केला जाईल आणि पाकिस्तानचा ‘नेट रन रेट’ प्रचंड खाली येईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय संघ आयसीसीच्या नियमावलीनुसार सर्व तयारी पूर्ण करेल. टीम इंडिया नियोजित वेळी श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर पोहोचेल. जर पाकिस्तानचा संघ मैदानात आला नाही, तर मॅच रेफरी सामन्याबाबत अंतिम निर्णय घेतील.
SL/ML/SL