पाकिस्तानचा अफगाणिस्तानात हवाई हल्ला

 पाकिस्तानचा अफगाणिस्तानात हवाई हल्ला

इस्लामाबाद, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक समस्यांनी ग्रस्त पाकीस्तानला सतत दुसऱ्यांवर कुरघोडी करण्यातच स्वारस्य असल्याचे दिसते. देशातील नागरिक महागाईच्या समस्येने त्रस्त असताना पाकीस्तान सरकार शेजारील अफगाणिस्तानवर हल्ला करत आहे. पाकिस्तानने मंगळवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी तालिबानच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य करत हवाई हल्ला केला. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील डोंगराळ भागात हे हल्ले करण्यात आले. या हवाई हल्ल्यात 15 जण ठार झाले आहेत. या हल्ल्यात पाकिस्तानी तालिबान म्हणजेच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त एजन्सी एपीने पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे.

अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, पाकिस्तानी विमाने अफगाणिस्तानात किती अंतरापर्यंत गेली आणि त्यांनी हल्ले कसे केले हे स्पष्ट झालेले नाही. मार्चनंतर पाकिस्तानने दुसऱ्यांदा अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ला केला आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की पाकिस्तानी तालिबान अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून तेथे दहशतवादी हल्ले करतात. मात्र, अफगाणिस्तानने पाकिस्तानचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध केला आहे. बॉम्बहल्ल्यात महिला आणि मुलांसह नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप काबुलने केला आहे. अफगाणिस्तानने याला आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन म्हटले आहे. अफगाण संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली. मंत्रालयाने लिहिले की अशी एकतर्फी पावले कोणत्याही समस्येवर उपाय नाहीत. अफगाणिस्तानने सांगितले की ते हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. मंत्रालयाने लिहिले की, ‘मातृभूमीचे रक्षण करणे हा आमचा अधिकार आहे, आम्ही या भ्याड हल्ल्याला नक्कीच प्रत्युत्तर देऊ.’

SL/ML/SL
25 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *