पाकने PoK मध्ये लावला कर्फ्यू

इस्लामाबाद, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून पाकीस्तानमधील सामान्य नागरिक भरडून निघत आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या सत्ता बदलानंतरही येथील परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. यामुळे त्रस्त झालेले सामान्य नागरिक आता रस्त्यावर उतरल आहेत. PoK (पाकव्याप्त काश्मीर) मध्ये वाढती महागाई आणि वीज कपातीविरोधात आज(10 मे) पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. निदर्शने थांबवण्यासाठी पाकिस्तानने मीरपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. लोक कर्फ्यूला विरोध करत आहेत. PoK मधील मीरपूरमध्ये पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, अनेक विद्यार्थी जखमी झाले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील मुझफ्फराबादमधील लोक 11 मे रोजी विधानसभेबाहेर मोठे आंदोलन करणार आहेत.
PoK मध्ये अनेक ठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. तिथे एक किलो पीठ 800 पाकिस्तानी रुपयांना मिळते. तर पूर्वी ते 230 रुपये होते. तर एका रोटीचा भाव 25 रुपयांवर पोहोचला आहे. देशाचा परकीय चलनाचा साठा सध्या $8 अब्ज इतका आहे, जो सुमारे दीड महिन्याच्या वस्तूंच्या आयातीइतका आहे. कोणत्याही देशाकडे किमान 3 महिने माल आयात करण्याइतका पैसा असणे आवश्यत असते. 2024 मध्ये पाकिस्तानचा जीडीपी केवळ 2.1% दराने वाढण्याची शक्यता आहे. सध्या एका डॉलरची किंमत 276 पाकिस्तानी रुपयांएवढी आहे.
PoK चा सर्वात मोठा पक्ष, युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी (यूकेपीएनपी) ने आंदोलनादरम्यान केलेल्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी आणि लष्कराने मिळून अटक केलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे पक्षाने म्हटले आहे. UKPNP नेते शौकत अली काश्मिरी आणि नासिर अझीझ खान यांनी अटक केलेल्या आंदोलकांची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली. UKPNP ने UN मानवाधिकार संस्थेला विलंब न करता हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
पीओकेमधील खराब परिस्थितीबद्दल, पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने (एचआरसीपी) स्वतः कबूल केले आहे की तेथे सातत्याने मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात आहे. गेल्या महिन्यातही लोकांनी वाढत्या महागाईविरोधात निदर्शने केली होती.
SL/ML/SL
10 May 2024