महादेव बेटींग app च्या मालकाला दुबईतून अटक

दुबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे जोडली गेल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महादेव बेटींग app चर्चेत होते. आज महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपचा सह-संस्थापक रवी उप्पल याला संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय एजन्सीच्या सूचनेवर कारवाई करत दुबईच्या स्थानिक पोलिसांनी रवी उप्पलला ताब्यात घेतले आहे. यानंतर त्याचा सहकारी सौरभ चंद्राकरलाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्या ठिकाणाची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात ईडीने दोन महिन्यांपूर्वी मुंबई, कोलकाता आणि भोपाळमधील 39 ठिकाणी छापे टाकून 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. रवी उप्पल हा सौरभ चंद्राकरसोबत युएईमध्ये राहत होता. अवघ्या महिन्याभरापूर्वी केंद्र सरकारने महादेव बेटिंग अॅपसह 22 बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला होता.
2017 मध्ये, रवी आणि सौरभ यांनी मिळून ऑनलाइन सट्टेबाजीद्वारे पैसे कमवण्यासाठी वेबसाइट तयार केली. तथापि, सुरुवातीला या वेबसाइटचे वापरकर्ते कमी होते आणि त्यातून फारच कमी कमाई होते. 2019 मध्ये सौरभ नोकरीसाठी दुबईला गेला होता. काही वेळाने सौरभने त्याचा मित्र रवी उत्पल यालाही दुबईला बोलावले.
रवी दुबईला पोहोचण्यापूर्वी सौरभने बेटिंग वेबसाइटच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संपूर्ण योजना तयार केली होती. यानंतर दोघांनी महादेव बुक ऑनलाइन नावाने बेटिंग वेबसाइट आणि अॅप तयार केले. सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून त्याचा प्रचार सुरू केला.
SL/KA/SL
13 Dec. 2023