४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन गंगापूर येथे
छ. संभाजीनगर दि २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाडा साहित्य परिषदेचे ४३ वे मराठवाडा साहित्य संमेलन गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे दिनांक २ आणि ३ डिसेंबर २३ रोजी संपन्न होणार आहे. या संमेलनाअध्यक्षपदी प्रख्यात लेखक डॉक्टर जगदीश कदम हे असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दोन डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे तर समारोप कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता होईल असे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गंगापूर शहरात निघणारी ग्रंथ दिंडी आणि ग्रंथ प्रदर्शन संमेलनाचे आकर्षण आहे, तसेच मराठवाड्यातील नामांकीत कवी गीतकारांची संवाद, प्राध्यापक राजेश सरकटे निर्मित “चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली” हा मराठवाड्यातील कवितेचा आठशे वर्षाचा इतिहास मांडणारा काव्य गायनाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. या पत्रकार परिषदेत आमदार सतीश चव्हाण स्वागत अध्यक्ष लक्ष्मणराव मनाळ तसेच परिषदेचे आणि स्वागत मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ML/KA/SL
20 Nov. 2023