विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आक्षेपार्ह भाषेबद्दल झाले निलंबित

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेत आक्षेपार्ह , असभ्य भाषा वापरल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं चालू अधिवेशन काळात पाच दिवसांच्या निलंबनाचा ठराव आज विधानपरिषदेत बहुमतानं संमत करण्यात आला. यावर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत चर्चा करण्याची मागणी केली मात्र निलंबनाच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही असं सांगत चुकीचा पायंडा पाडू नये, नियमानुसारच ही कारवाई झालेली आहे, असं सभागृह नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं .
यानंतर विरोधक हौद्यात उतरले त्यांनी उपसभापतींच्या विरोधात घोषणा दिल्या आणि सभात्याग केला. हा ठराव संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. यावर आपल्या भावना व्यक्त करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांच्यावरील कारवाई ही न्याय्य, योग्य आणि उचित असल्याचं सांगितलं. दानवे यांनी अशाप्रकारची भाषा वापरल्यानंतरही हे वर्तन अयोग्य असल्याची त्यांची कोणतीही भावना नव्हती.
एका महिला उपसभापतीसमोर अशा प्रकारची भाषा जर वापरली जात असेल तर अशाप्रकारचं वर्तन कुठेही करण्याची मुभा आपण देतो आहे का ..? आपण कोणती संस्कृती रुजवतोय असा प्रश्न उपस्थित करत उपसभापतींनी हे अत्यंत क्लेशदायक असल्याचं सांगितलं. विरोधी पक्षानं देखील या कारवाईवर आक्षेप न घेता समजून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ML/ML/SL
2 July 2024