विरोध संपला, विश्वास वाढला

दापोली दि १४ :– दापोलीचे माजी आमदार आणि शिवसेना उपनेते संजय कदम यांनी काल फरारे (मोगरेवाडी) येथे झालेल्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण राजकीय घोषणा केली. “पुढच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही शिवसेनेचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,” असे सांगत त्यांनी नमूद केले की, “योगेशदादांना आम्ही पुढच्या निवडणुकीत एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवून देणार आहोत.”
या कार्यक्रमात फरारे (मोगरेवाडी) येथील संपूर्ण वाडीने एकमुखी निर्णय घेत शिवसेनेत प्रवेश केला. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पक्षप्रवेश करून आपला विश्वास आणि पाठिंबा जाहीर केला. या पक्षप्रवेशामुळे गावागावांमध्ये असलेला राजकीय संघर्ष संपुष्टात आला असून, विकासकामांना नवे बळ आणि गती मिळत आहे.
संजय कदम यांच्या शिवसेना प्रवेशामुळे दापोली मतदारसंघातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली असून, मंत्री योगेश कदम यांच्याविरोधातील वातावरण आता पूर्णतः निवळले आहे. “ज्यांच्या विरोधात आम्ही पूर्वी निवडणूक लढवली, त्यांच्याच नेतृत्वाला आता पाठिंबा देत आहोत, हेच आमची निष्ठा आणि बांधिलकी दर्शवते,” असेही संजय कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले.
योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली मतदारसंघात विकासकामांचा वेग वाढला असून, त्यांचा सर्वसामान्यांशी असलेला थेट संपर्क आणि कामाची पारदर्शकता यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. उपनेते संजय कदम यांच्या सक्रिय पाठबळामुळे दापोली हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला ठरणार, असा आत्मविश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.