ऑपरेशन सिंदूर पत्रकार परिषद -पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांचा सहभाग

नवी दिल्ली,दि. ७ : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत सरकारने आखलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या दहशतवाद्यांविरोधात चालवलेल्या मोहिमेची माहिती विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच, सशस्त्र दलातील दोन महिला पत्रकार परिषदेत सहभागी झाल्या.
पत्रकार परिषदेत बोलताना विक्रम मिस्त्री म्हणाले की, पाकिस्तानने दीर्घकाळ सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन दिले आहे. पाकिस्तानला दहशतवादी कारवाया करण्यापासून रोखणे महत्त्वाचे आहे. पहलगाम हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचा संबंध उघड झाला आहे, असेही ते म्हणाले. त्यापैकी एक हवाई दल आणि दुसऱ्या लष्कराच्या अधिकारी आहेत.
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांविरुद्ध केलेल्या कारवाईची संपूर्ण माहिती दिली. विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करण्यात आले. 9 दहशतवादी तळ लक्ष्य करून यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले. विश्वसनीय गुप्तचर माहिती आणि या तळांची दहशतवादी कारवायांमध्ये असलेली भूमिका या आधारावर लक्ष्यांची निवड करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. “नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान आणि जीवितहानी टाळण्यासाठी ठिकाणे निवडली गेली,” असेही त्या म्हणाल्या. ही कारवाई रात्री 1:05 वाजता सुरू झाली आणि 25 मिनिटे चालली.
‘ऑपरेशन सिंदूर’ चे महत्त्व
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) आणि जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनांचे बालेकिल्ले असलेल्या 9 दहशतवादी ठिकाणांवर 24 अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. पत्रकार परिषदेत सरकारने 9 दहशतवादी तळांचे महत्त्व स्पष्ट केले.
मुजफ्फराबादमधील सवाई नाला तळ – पाकिस्तानच्या आत 30 किलोमीटरवर होता आणि तो लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षण तळांपैकी एक होता.
पीओकेमधील सय्यदना बिलाल तळ – जैश-ए-मोहम्मदचा तळ होता.
कोटलीमधील गुलपूर तळ नियंत्रण रेषेपासून 30 किलोमीटरवर होता. एप्रिल 2023 रोजी पूंछ हल्ला आणि जून 2024 रोजी यात्रेकरूंवरील हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचे प्रशिक्षण येथे झाले होते.
भीमबरमधील बरनाला तळ नियंत्रण रेषेपासून 9 किलोमीटरवर होता.
कोटली अब्बास नियंत्रण रेषेपासून 13 किलोमीटरवर होता आणि येथे 15 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊ शकत होते.
सियालकोटमधीलसरजल तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ 6 किलोमीटरवर होता. मार्च 2025 मध्ये 4 सैनिकांच्या हत्येत सहभागी दहशतवाद्यांना येथे प्रशिक्षण देण्यात आले होते.
सियालकोटमधील मेहमूना जोया तळ हिजबुल मुजाहिदीनचा बालेकिल्ला होता.
मुरिदकेमधील मरकज तैयबा हा 2008 च्या मुंबई हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण केंद्र होता.
बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाह जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते.
या दहशतवादी तळांवर हवाई हल्ल्यात लक्ष्य करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली.